Maharashtra Election 2019 : गडकिल्ल्यांवर लग्नसोहळे? उदयनराजेंनी दिले असे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 11:38 IST2019-10-16T11:35:47+5:302019-10-16T11:38:58+5:30
शिवकालीन गडकिल्ले लग्नसोहळ्यांसारख्या समारंभांसाठी भाड्याने दिल्यास मिळणाऱ्या उत्पन्नातून अर्थव्यवस्था सुधारेल, असे वक्तव्य केल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपा नेते उदयनराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

Maharashtra Election 2019 : गडकिल्ल्यांवर लग्नसोहळे? उदयनराजेंनी दिले असे स्पष्टीकरण
सातारा - शिवकालीन गडकिल्ले लग्नसोहळ्यांसारख्या समारंभांसाठी भाड्याने दिल्यास मिळणाऱ्या उत्पन्नातून अर्थव्यवस्था सुधारेल, असे वक्तव्य केल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपा नेते उदयनराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका होत आहे. दरम्यान, उदयनराजेंनी आता याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. प्रत्येक गडकिल्ल्यावर असलेल्या मंदिरात त्या परिसरात राहणारे लोक साध्या पद्धतीने विवाह सोहळे आयोजित करत असतात, त्यामुळे तेथे विवाहसोहळे आयोजित करण्यात काही गैर आहे, असे मला वाटत नाही. गडकिल्ल्यांवरील पर्यटन वाढले पाहिजे,''असे उदयनराजेंनी सांगितले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये उदयनराजेंनी गडकिल्ल्यांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की,''प्रत्येक गडकिल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी विशिष्ट्य उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून बांधला होता. आज काही किल्ल्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी गडकिल्ल्यांवरील पर्यटन वाढवले पाहिजे. रोप वेसारखे मार्ग निर्माण झाल्यास अधिकाधिक लोक गडकिल्ल्यांना भेट देतील.''
''आता गडकिल्ल्यांवरील विवाह सोहळ्यांबाबत म्हणाल तर या गडकिल्ल्यांवर साधेपणाने विवाहसोहळे आयोजित होत असतात. गडकिल्ल्यांच्या परिसरात राहणारे लोक येथील मंदिरांमध्ये विवाह सोहळे आयोजित करतात. तसेच येथील मंदिरात दर्शन घेण्यासाठीही अनेकजण जातात. मात्र काल माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. बोलण्याला वेगळा अँगल दिला गेला. गडकिल्ल्यांवर पर्यटन वाढले पाहिजे. मात्र तिथे बार, रेस्टॉरंटसारख्या संस्कृतीला माझाच काय सर्वांचाच विरोध असले,''असे उदयन राजेंनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले ऐतिहासिक गडकिल्ले हॉटेल आणि लग्नसमारंभासाठी राज्य सरकार भाड्याने उपलब्ध करुन देण्याच्या धोरणावर सर्वत्र राज्यातून सरकारवर टीका करण्यात आली होती. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व भाजपाचे नेते उदयनराजे भोसले यांनी सरकारच्या या धोरणाला पाठिंबा दिल्याचे वृत्त काल एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रकाशित झाले होते. ''गडकिल्ले भाड्याने उपलब्ध करुन देण्याच्या धोरणावर माध्यमांनी चुकीचे वळण दिले आहे. मी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याशी या विषयावर चर्चा केली असून मला त्यांनी सरकारचे हे धोरण पूर्णपणे समजावून सांगितले. सरकारच्या धोरणात किल्ल्यांचा काही भाग लग्न समारंभास भाड्याने द्यावा, असे म्हटले आहे. त्यामुळे मला यामध्ये काहीही चुकीचे वाटत नाही. त्याचप्रमाणे आपण देवळात लग्न लावत नाही का? असा प्रश्न देखील उदयनराजेंनी उपस्थित केला आहे. पर्यटनावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते. त्यामुळे गडकिल्ले भाड्याने दिल्यास आपल्या देशाची अर्थव्यवस्था सुधारेल असां विश्वासही उदयनराजेंनी व्यक्त केला होता.
Maharashtra Election 2019: कलम ३७० वर प्रश्न विचारणाऱ्यांनी देशात राहू नये; उदयनराजेंची राजे'शाही'