मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 15:04 IST2024-11-27T15:03:14+5:302024-11-27T15:04:01+5:30
Ajit pawar CM News: मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अजित पवार कुठे आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अजित पवार यांनी ४१ जागा जिंकून शरद पवारांनीच वर्षानुवर्षे मळलेली वाट धरली आहे.

मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
महाराष्ट्रात महायुतीची पुन्हा सत्ता आली आहे. प्रचंड बहुमत असल्याने शिवसेना आणि भाजपात मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु आहे. या शर्यतीत अजित पवार कुठे आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अजित पवार यांनी ४१ जागा जिंकून शरद पवारांनीच वर्षानुवर्षे मळलेली वाट धरली आहे. मुख्यमंत्री पदाचे सोडा, जेवढी महत्वाची मंत्रिपदे पदरात पाडता येतील त्यासाठी अजित पवारांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या दोघांच्या वादात राष्ट्रवादी आपला फायदा करून घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अजित पवारांनी सुनिल तटकरेंना दिल्लीत अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यास लावली आहे. तत्पूर्वी तटकरेंनी फडणवीसांची देखील भेट घेतली आहे. मुख्यमंत्री पद सोडून जास्तीत जास्त महत्वाची खाती आपल्याकडे घ्यायची ही शरद पवारांची रणनिती होती. यासाठी त्यांनी जास्त जागा असूनही काँग्रेसलाच मुख्यमंत्री केले होते. तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीच ठेवले होते.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्री बनण्याचा विक्रम केला असे जरी बोलले जात असले तरी वाटाघाटीत अर्थखाते, महसूल, गृह खाते शरद पवारांनी आपल्याकडेच ठेवली होती. याला अजित पवार कंटाळले, अन्याय झाल्याचे बोलले जात असले तरी देखील अजित पवारांनी आताची राजकीय परिस्थिती पाहून शरद पवारांच्याच वाटेने जाण्यास प्राधान्य दिले आहे.
अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होण्याची शक्यता आहे. तसेच महसूल, महिला व बाल कल्याण आदी खाती आपल्याकडे कशी घेता येतील यासाठी लॉबिंग करण्याची शक्यता आहे. याचबरोबर केंद्रातही एखादे मंत्रिपद मिळविता आले तर त्याकडेही अजित पवार गट प्रयत्न करत आहे.