मराठवाड्यातील 6 आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ, 3 नवीन चेहऱ्यांना संधी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 19:05 IST2024-12-15T19:04:16+5:302024-12-15T19:05:16+5:30
Maharashtra Cabinet Expansion : आज नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला.

मराठवाड्यातील 6 आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ, 3 नवीन चेहऱ्यांना संधी...
Maharashtra Cabinet Oath Taking Ceremony : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज(दि.15) नागपूरात पार पडला. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या मंत्रिमंडळ विस्तारात सर्व समाजाला प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जातीय समतोल साधला गेला आहे. तसेच, सर्व विभागातील आमदारांनाही संधी मिळाली आहे. यात मराठवाड्यातील 6 आमदारांचा समावेश आहे.
महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात मराठवाड्याच्या वाट्याला 6 मंत्रीपदे आली आहेत. यात तीन जुने चेहरे आहेत, तर तीन नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे. जुन्या चेहऱ्यांमध्ये बीड जिल्ह्यातील मुंडे भाऊ-बहीण, म्हणजेच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा समावेश आहे. पंकजा मुंडे दुसऱ्यांदा, तर धनंजय मुंडे तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री बनले आहेत. याशिवाय, औरंगाबाद(छत्रपती संभाजीनगर) पूर्वमधून हॅट्रिक करणारे भाजप नेते अतुल सावे हेदेखील सलग तिसऱ्यांदा मंत्री झाले आहेत.
नवीन चेहऱ्यांमध्ये शिवसेना आमदार संजय शिरसाट, भाजप आमदार मेघना बोर्डीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबासाहेब पाटील यांचा समावेश आहे. संजय शिरसाट औरंगाबाद(छत्रपती संभाजीनगर) पश्चिममधून सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. तर, भाजप नेत्या मेघना बोर्डीकर सलग दुसऱ्यांदा परभणी जिल्ह्यातील जिंतूर मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटीलदेखील सलग दुसऱ्यांदा लातूर जिल्ह्यातील अहमदपूरमधून निवडून आले आहेत. अशारितीने मराठवाड्यातील सहा नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे.
पाहा फडणवीस सरकारमधील ३९ मंत्र्यांची यादी