कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? ११ व्या क्रमांकावर; जयंत पाटलांनी सांगितली कशी झाली वाताहात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 14:28 IST2024-11-12T14:27:16+5:302024-11-12T14:28:45+5:30
महाविकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील यांनी आज सभा घेतली. यावेळी पाटील यांनी महाराष्ट्र कसा मागे राहिला आणि गुजरात कसा पुढे गेला ते सांगितले.

कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? ११ व्या क्रमांकावर; जयंत पाटलांनी सांगितली कशी झाली वाताहात
पहाटेच्या शपथविधीनंतर सगळ्यात पहिले शरद पवार यांच्याकडे दोन तासात कोण आले असेल तर ते डॉ. राजेंद्र शिंगणे होते. पुन्हा एकदा शपथविधी झाला तो दुपारचा झाला आणि ते तिकडे असले तर प्रश्न सुटावेत, बँकेला भाग भांडवल मिळावे या उद्देशाने त्यांनी प्रयत्न केले. सगळ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा आजच्या सरकारने प्रयत्न केला. पक्ष फुटायला नको होता याची वेळोवेळी डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी खंत व्यक्त केली, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
महाविकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील यांनी आज सभा घेतली. यावेळी पाटील यांनी महाराष्ट्र कसा मागे राहिला आणि गुजरात कसा पुढे गेला ते सांगितले. ''या सरकारने काय काय उद्योग केलेत ते सांगतो. मी जेव्हा अर्थमंत्री होतो तेव्हा महाराष्ट्राचा दरडोई उत्पन्नात देशात दुसरा-तिसरा क्रमांक असायचा. गुजरात फार मागे होते जवळपास देखील नव्हता. 2014 मध्ये मोदी दिल्लीत आणि फडणवीस राज्यात बसले आणि 2016 मध्ये मागे असणारे गुजरात पुढे गेले. आपण सहाव्या क्रमांकावर गेलो. आज आकडेवारी काढली तर देशात आपल्या राज्याचा अकरावा क्रमांक आहे, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? असा सवाल जयंत पाटील यांनी केला.
गुजरातचे लोक आपल्यापेक्षा श्रीमंत झाले आहेत. जे राज्य गरीब होते ते मागील दहा वर्षात आपल्यापेक्षा पुढे गेले आहे. नाकर्तेपणाची भूमिका, गुजरातला घाबरण्याची भूमिका, मोदी शहांच्या समोर मान झुकवण्याची भूमिका कोणतीही गोष्ट गुजरात ने हिरावून घेतल्यावर कारे म्हणण्याची ताकत नसणारी लोक या महाराष्ट्रात नेतृत्व करत आहेत, असा आरोप पाटील यांनी केला. महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर जाताना थांबवले नाहीत. परिणामी बेरोजगारांची संख्या आपल्या राज्यात वाढत चालली आहे. एकनाथ शिंदे यांना बोलताना मर्यादा आहेत, ते मोदी-शाह यांना दुखावू शकत नाहीत, अशी टीका पाटील यांनी केली.
आपल्या सगळ्यांना लुबाडायचं काम हे सरकार करत आहे. शेतकऱ्यांना बुडवण्याचे काम मागील अडीज वर्षात या सरकारने केले आहे. शरद पवार दिवसाला सहा-सात सभा घेत आहेत, या वयात एवढे कष्ट महाराष्ट्रात नव्हे देशात कुठल्या नेत्याने केले नसतील, असे पाटील म्हणाले.