महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 06:54 PM2024-11-30T18:54:14+5:302024-11-30T18:58:37+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीचा शपथविधी कधी होणार, कुठे होणार आणि कोण येणार, याबाबतची घोषणा केली आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अनेक दिवस उलटून गेले असले तरी अद्याप महायुतीने सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सपाटून पराभव झाला. महाविकास आघाडीतील अनेक उमेदवारांनी पराभवाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडले. तर अनेक उमेदवारांनी पैसे भरून फेरमतमोजणीची मागणी केली आहे. एकीकडे विरोधक ईव्हीएमविरोधात आक्रमक होत असून, दुसरीकडे मोठा जनाधार मिळूनही महायुती सत्तास्थापनेसाठी करत असलेला उशीर राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. यातच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शपथविधी कधी होणार, कोण येणार आणि कुठे होणार, याबाबतची घोषणा केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून बावनकुळे यांनी शपथविधी सोहळ्याविषयी माहिती दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे की, राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवार, ५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे.
मुख्यमंत्री कोण? यावर सस्पेन्स कायम
महायुतीला जनतेने प्रचंड यश दिले. न भूतो असा विजय महायुतीचा झाला. तर, महाविकास आघाडीला जनतेने सपशेल नाकारले. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता जवळपास आठवडा आला, तरी महायुतीचे सरकार कधी स्थापन होणार, याबाबत स्पष्टता येत नव्हती. परंतु, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ट्विटने यावरील अनिश्चिततेचे मळभ दूर केले आहे. असे असले तरी मुख्यमंत्री कोण होणार, उपमुख्यमंत्री कोण असणार, महायुतीतील किती आमदार शपथ घेणार, मंत्रिमंडळात कोण असणार, खातेवाटप कसे होणार, यांसारख्या अनेक प्रश्नांवर सस्पेन्स कायम आहे.
दरम्यान, सत्ता स्थापनेबाबत विरोधक महायुतीवर टीका करत असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. महायुतीतील नेतेही महाविकास आघाडीला प्रत्युत्तर देताना पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे, राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या साताऱ्यातील मूळ गावी आहेत. सत्ता स्थापनेच्या धावपळीतच ते गावी आल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते. गावी आल्यानंतर एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या दरे येथील बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल झाली आहे. त्यांच्या शरीराचे तापमान हे १०४° असून, उपचार सुरू असल्याचे सूत्रांकडून समजत आहे. तसेच प्रकृतीच्या कारणास्तव शिंदे आज बाहेर पडले नाहीत. त्यांनी घरीच आराम करणे पसंत केले. ऐन राजकीय घडामोडींच्या काळातच शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे.
राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) November 30, 2024
विश्वगौरव माननीय पंतप्रधान श्री. @narendramodi जी यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे.
राज्य में महायुती सरकार का शपथ ग्रहण समारोह
विश्वगौरव माननीय प्रधानमंत्री श्री…