"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 18:46 IST2024-10-11T18:46:28+5:302024-10-11T18:46:58+5:30
Maharashtra Assembly Election 2024: काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अजित तवार हे तडकाफडकी निघून गेल्याने या चर्चांना अधिकच उधाण आलं होतं. दरम्यान, आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून तडकाफडकी निघून जाण्यामागचं नेमकं कारणं अजित पवार यांनी सांगत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट
मागच्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचा नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गट महायुती सरकारमध्ये राहणार की नाही याबाबबत राज्याच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्यात काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अजित तवार हे तडकाफडकी निघून गेल्याने या चर्चांना अधिकच उधाण आलं होतं. दरम्यान, आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून तडकाफडकी निघून जाण्यामागचं नेमकं कारणं अजित पवार यांनी सांगत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
याबाबत स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले की, असं काहीही घडलेलं नाही. वृत्तवाहिन्यांना २४ तास काही ना काही दाखवायचं असतं. त्यामुळे वेगळ्या पद्धतीने बातम्या सोडल्या जातात. काल लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात माझा कार्यक्रम होता. १० वाजता कॅबिनेटची बैठक होती. मात्र ती काही कारणानं उशिरा सुरू झाली. तर १ वाजता माझं विमान होतं. कॅबिनेट उशिरा सुरू झाल्याने ११.३० ते १ वाजेपर्यंत मी तिथे थांबलो. मात्र १ वाजता माझं जाणं गरजेचंच होतं. त्यामुळे मी १२.३० ला तिथून निघालो. विमानानं नांदेडला पोहोचून पुढे हेलिकॉप्टरनं अहमदपूरला जायचं होतं, असे अजित पवार यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, अहमदपूरला अगदी साधेपणाने शेतकरी मेळावा संपन्न झाला. काल एक दु:खद घटना घडली होती. त्यामुळे कुठलंही स्वागत स्वीकारलं नाही. तिथे रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच कार्यक्रम आटोपल्यावर मी परत मुंबईला आलो, असेही अजित पवार यांनी सांगितले.