एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 17:19 IST2024-11-07T17:17:29+5:302024-11-07T17:19:33+5:30
एकनाथ शिंदे हे विधानसभा निवडणुकीतून उभं न राहता राज्यभरात महायुती उमेदवारांचा प्रचार करण्याचा विचार करत होते.

एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
ठाणे - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रंगत आता हळूहळू वाढत आहे. त्यात ठाण्याचे शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते असं विधान म्हस्के यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले आहे.
खासदार नरेश म्हस्के म्हणाले होते की, एकनाथ शिंदे पायाला भिंगरी लावल्यासारखे काम करत असतात. गेल्या आठवड्यात आमचे माजी खासदार राहुल शेवाळे आणि संजय निरुपम यांच्याकडे त्यांनी भावना व्यक्त केली. मी काही विधानसभेची निवडणूक लढणार नाही. मला अख्ख्या महाराष्ट्रात फिरायचंय. त्यावेळी आम्ही साहेबांकडे गेलो, त्यांनी सांगितले, असं चालणार नाही. तुम्ही फक्त उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मतदारसंघात या, बाकी आम्ही सांभाळतो, त्यावेळी त्यांनी विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरला असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
राज्यातील महायुतीचा प्रत्येक उमेदवार प्रचारासाठी येण्यास सांगत होता, परंतु कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून लढलो तर उमेदवारांच्या प्रचाराला जाणे शक्य होणार नाही असं एकनाथ शिंदेंना वाटत होते. परंतु एकनाथ शिंदेंनी निवडणूक लढवावी असा आमचा आग्रह होता. तुम्ही अर्ज भरा, आम्ही स्वत:ला एकनाथ शिंदे समजून तुमचा प्रचार करू अशी विनंती शिंदेंना केली. त्यानंतर ते निवडणूक लढण्याचा विचार करू लागले. मुख्यमंत्री शिंदे स्वत:पेक्षा इतरांचा विचार करतात. त्यांचे सर्व ठिकाणी लक्ष आहे असंही खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलं.
दरम्यान, कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली आहे. मनसेने या मतदारसंघात उमेदवार उतरवला नाही. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीकडून एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडीकडून केदार दिघे अशी थेट लढत होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर त्यांना सर्वाधिक फटका ठाणे जिल्ह्यात बसला. याठिकाणी बहुतांश पदाधिकारी शिंदेसोबत गेले. ठाणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत भिवंडी वगळता इतर कुठल्याही मतदारसंघात महाविकास आघाडीला यश मिळालं नाही. ठाण्यात उद्धव ठाकरेंसोबत राहिलेले राजन विचारे यांचाही लोकसभा निवडणुकीत पराभव झाला.