महाराष्ट्रातील आजच्या राजकीय परिस्थितीला शरद पवार जबाबदार; महायुतीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 06:01 PM2024-04-18T18:01:21+5:302024-04-18T18:02:41+5:30

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. त्यात महायुतीकडून शरद पवारांवर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. 

Loksabha Election- Sharad Pawar responsible for today's political situation in Maharashtra; Allegation of mahayuti leaders Deepak Kesarkar | महाराष्ट्रातील आजच्या राजकीय परिस्थितीला शरद पवार जबाबदार; महायुतीचा आरोप

महाराष्ट्रातील आजच्या राजकीय परिस्थितीला शरद पवार जबाबदार; महायुतीचा आरोप

मुंबई - Deepak Kesarkar on Sharad Pawar ( Marathi News ) महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार हे कारणीभूत आहेत. भाजपा, अजित पवार यांना व्हिलन करायचे आणि आपणच शिवसेनेचे तारणहार आहोत असं चुकीचे चित्र शरद पवारांविषयी तयार होत आहे जे चूक आहे, असा आरोप शिवसेना नेते मंत्री दिपक केसरकर यांनी केला आहे. 

आज पार पडलेल्या महायुतीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केसरकर म्हणाले की, सामान्य शिवसैनिक जो बाळासाहेबांनी घडवला त्याच्यापर्यंत योग्य भूमिका पोहचणे आवश्यक आहे. बाळासाहेबांचा विचार कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात इतिहास घडवला. मात्र शरद पवारांनी वेळोवेळी भूमिका बदलून राजकारण केले. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी एकमेकांविरोधात बोलायचे नाही, असे १९८९ मध्ये ठरवले होते. बाळासाहेबांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत हा शब्द पाळला. परंतु शिवसेनेच्या बाबत वेगळेच घडले. शिवसेनेत तीन चार वेळा फूट पडली, त्यामध्ये शरद पवार यांची प्रमुख भूमिका होती असं त्यांनी म्हटलं. 

राज्यात २०१९ मधील निवडणुकीनंतर शरद पवारांनी न मागता भाजपाला पाठिंबा दिला होता. यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी केली. त्या दिवसापासून शिवसेनेला संपवण्याची सुरुवात झाली असे केसरकर यांनी सांगितले. २०१७ मध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अनेक बैठका झाल्या. यात कोण मंत्री असावे इतके सूक्ष्म नियोजन झाले होते. याचा प्रस्ताव जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला तेव्हा मोदींनी सांगितले की, राष्ट्रवादीला सोबत घेण्यास हरकत नाही पण शिवसेना कुठल्याही परिस्थितीत सत्तेत असली पाहिजे. मोदींनी नेहमीच शिवसेनेला सोबत ठेवले मात्र उद्धव ठाकरेंकडून आज मोदींना विरोध केला जात आहे असंही केसरकरांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. 

तसेच याउलट शरद पवारांनी शिवसेना जर सत्तेत असेल तर आम्ही भाजपसोबत येणार नाही, अशी उघड भूमिका घेतली होती. पवारांना आज शिवसैनिकांची मदत हवीय पण त्यांच्या मनात शिवसेना संपवायची हा विचार आहे. महाविकास आघाडी सरकारवेळी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करताना शरद पवार यांनी घेतलेली भूमिका अयोग्य होती. एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली ज्येष्ठ नेते काम करणार नाहीत, अशी पवारांनी भूमिका घेतली होती, मात्र आजच्या घडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबरीने राज्यात अनेक वरिष्ठ नेते काम करत आहेत असंही केसरकरांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, कुटुंबांत फूट पाडण्याचा आरोप शरद पवार करतात, मात्र ही गोष्ट अनेकवेळा त्यांच्यामुळेच घडली आहे. शिवसेना ही गोरगरिबांसाठी धावून जाणारी संघटना आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना टिकली पाहिजे. ज्या दिवशी काँग्रेससोबत जाण्याची वेळ येईल, तेव्हा मी राजकारण सोडेन इतके सुस्पष्ट विचार बाळासाहेब ठाकरे यांचे होते. अजित दादांना कुठेतरी व्हिलन करायचे आणि स्वत: हिरो बनायचे ही भूमिका योग्य नाही. गेल्या १५ ते २० वर्षात राज्यात अनेक तरुण नेते तयार झालेत. ज्यात देवेंद्र फडणवीस, अजित पवार तयार झाले. या तरुण नेत्यांची फळी कापून काढायची असा शरद पवारांचा विचार आहे. शरद पवार राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी चांगल्या कामाला आशीर्वाद देणे अपेक्षित आहेत. त्यांनी अशा प्रकारचे राजकारण करणे जे महाराष्ट्राच्या हिताचे नाही असंही महायुतीकडून सांगण्यात आले. 

Web Title: Loksabha Election- Sharad Pawar responsible for today's political situation in Maharashtra; Allegation of mahayuti leaders Deepak Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.