प्रकाश आंबेडकरांची भूमिका लोकशाही, संविधानविरोधी; काँग्रेसची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 04:23 PM2024-04-04T16:23:55+5:302024-04-04T16:25:56+5:30

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीनं मविआशी फारकत घेत अनेक ठिकाणी उमेदवार घोषित केले. मात्र या उमेदवारांमुळे मविआच्या जागा धोक्यात आल्याची टीका काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येत आहे.

Loksabha Election 2024: Prakash Ambedkar's stance is anti-democratic, anti-constitutional; Criticism of Congress | प्रकाश आंबेडकरांची भूमिका लोकशाही, संविधानविरोधी; काँग्रेसची बोचरी टीका

प्रकाश आंबेडकरांची भूमिका लोकशाही, संविधानविरोधी; काँग्रेसची बोचरी टीका

मुंबई - Congress on Prakash Ambedkar ( Marathi News ) लोकसभेची सध्याची निवडणूक देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी अत्यंत निर्णायक आहे. ती भारतीय जनता पक्ष विरुद्ध इंडिया आघाडी अशी नसून नव फॅसिस्ट शक्ती विरोधातील निवडणूक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका हिटलरविरोधी आणि लोकशाहीच जनतेला खरा न्याय देऊ शकते अशी होती. या विचारांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची प्रकाश आंबेडकरांची भूमिका दुर्दैवी असून ती भाजपाला अनुकूल ठरणारी आहे अशी बोचरी टीका काँग्रेस नेते माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली आहे. 

मुंबईतील पत्रकार परिषदेत भालचंद्र मुणगेकर यांनी म्हटलं की, प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीपासून भाजपाच्या भूमिकेवर टीका केली होती. भाजपा संविधान विरोधी आहे, लोकशाही विरोधी आहे अशी भूमिका ते मांडत होते परंतु प्रत्यक्षात लढण्याची वेळ आली त्यावेळी त्यांनी भाजपला अनुकूल भूमिका घेतली. महाविकास आघाडीसोबत जागा वाटपाची चर्चा केली परंतु शेवटी वेगळे लढण्याचा निर्णय घेतला. वंचित आघाडीला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ४४ लाख मते पडली होती पण त्यात एमआयएमच्या मतांचा मोठा हिस्सा त्यात होता. विधानसभा निवडणुकीत एमआयएम सोबत नसल्याने वंचितच्या मतांमध्ये घसरण होत ही मते २१ लाखापर्यंत खाली आली. विधानसभा व लोकसभेत वंचितचा एकही उमेदवार विजयी झाला नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच लोकसभा निवडणुकीत वंचितमुळे काँग्रेस आघाडीचा ९ जागांवर पराभव झाला तर विधानसभा निवडणुकीत १६ जागांवर पराभव झाला परंतु वंचितमुळे भाजपाच्या एकाही उमेदवाराचा पराभव झालेला नाही. यावरून वंचितची भूमिका ही भाजपाला फायदेशीर अशीच ठरलेली आहे. यावेळी जागा वाटपाच्या सुरुवातीलाच त्यांनी प्रत्येक पक्षाला १२ जागा द्याव्यात यापासून सुरुवात केली होती. प्रकाश आंबेडकर यांनी साततत्याने टीकात्मक विधाने करूनही काँग्रेस पक्षाने त्यांना अत्यंत सन्मानाने १७ मार्च रोजीच्या शिवाजी पार्कवरील इंडिया आघाडीच्या जाहीर सभेला निमंत्रित केले. पण त्यासभेत त्यांनी केलेल्या विधानावरून त्यांची भूमिका साशंक आहे हे स्पष्ट झाले होते. प्रकाश आंबेडकरांची एकूण भूमिका पाहता त्यांना खरेच महाविकास आघाडीबरोबर आघाडी करायची होती का असा प्रश्न उपस्थित होतो असंही मुणगेकर यांनी म्हटलं. 

दरम्यान, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवाचे रान करून बनवलेले संविधानच मान्य नाही. सरसंघचालक गोलवलकर यांनी संविधानचा ‘गोधडी’ असा उल्लेख केला होता. प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे बौद्ध समाजात तीव्र नाराजी असून लोकशाही, संविधान व स्वांतत्र्य वाचवण्यासाठी दलित, वंचित, आदिवासी, अल्पसंख्यांक, महिला, मागासवर्गीय या सर्व समाज घटकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करून इंडिया आघाडीला मतदान करावे असं आवाहन डॉ. मुणगेकर यांनी जनतेला केले.

Web Title: Loksabha Election 2024: Prakash Ambedkar's stance is anti-democratic, anti-constitutional; Criticism of Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.