"कुणी उघड पाठिंबा देतंय, तर कुणी.."; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरे, प्रकाश आंबेडकरांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 03:22 PM2024-04-13T15:22:53+5:302024-04-13T15:23:49+5:30

Loksabha Election 2024: आज आम्हाला मजबूत देश हवाय, पण संमिश्र सरकार पाहिजे. कणखर नेता हवाय पण तो सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा पाहिजे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

Lok Sabha Elections - Uddhav Thackeray targets Raj Thackeray and Prakash Ambedkar | "कुणी उघड पाठिंबा देतंय, तर कुणी.."; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरे, प्रकाश आंबेडकरांवर निशाणा

"कुणी उघड पाठिंबा देतंय, तर कुणी.."; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरे, प्रकाश आंबेडकरांवर निशाणा

मुंबई - Uddhav Thackeray on Raj Thackeray, Prakash Ambedkar ( Marathi News ) काहीजण उघडपणे बिनशर्त पाठिंबा देतायेत तर काहीजण लढण्याचं नाटक करून पाठिंबा देतायेत. आता ही नाटके जनता ओळखते. त्यामुळे हुकुमशाहीविरोधात लोकशाही अशी सरळ लढाई येणाऱ्या लोकसभेत होणार आहे असं विधान करत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांवर निशाणा साधला. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, एकाधिकारशाही देशाला घातक आहे. हुकुमशाहाला पुन्हा स्वीकारणे घातक आहे. एककाळ असा होता, जेव्हा संमिश्र सरकार नको वाटायचे. परंतु अटलबिहारी वाजपेयी, नरसिंहराव, मनमोहन सिंग यांनीही उत्तम सरकार चालवलं. जर कालखंड पाहिला तर अपवाद वगळता संमिश्र सरकारच्या काळात देशाची प्रगती मजबूत झाली आहे. आम्हाला देश मजबूत हवा. सरकार संमिश्र पाहिजे. एका व्यक्तीच्या हाती संपूर्ण देश दिला तर तो देशाचा गळा घोटल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी म्हटलं.

तसेच आज आम्हाला मजबूत देश हवाय, पण संमिश्र सरकार पाहिजे. कणखर नेता हवाय पण तो सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा पाहिजे. जो देईल साथ त्यांचा करू घात अशी व्यक्ती, असा पक्ष आम्हाला नको. सर्वांना सोबत घेऊन चालणारं संमिश्र इंडिया आघाडीचं सरकार देशाला चांगल्यापद्धतीने प्रगती पथावर घेऊन जावू शकेल. आजपर्यंत आपण सगळे अनुभव घेऊन मोठे झालेत. आता ते संपूर्ण देशात एकच पक्ष ठेवण्याच्या मागे आहेत. ही वृत्ती घातक असल्याने एका व्यक्तीच्या मागे देश देऊ नये असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

दरम्यान, आज सर्वसामान्य जनतेला महागाई, बेरोजगारीने ग्रासले आहे. आम्हाला भारत सरकार हवं, मोदी सरकार नको. एका व्यक्तीचं सरकार कदापि देशवासिय मान्य करू शकत नाही. भ्रष्टाचारमुक्त करणार होते, भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेत इतर पक्ष भ्रष्टाचारमुक्त केलेत. आम्ही मविआच्या जागांची, उमेदवारांची घोषणा केली आहे. लवकरच एकत्रित सभा होतील. आता जागावाटप झालं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना समजावणं त्या त्या पक्षाची जबाबदारी आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 

Web Title: Lok Sabha Elections - Uddhav Thackeray targets Raj Thackeray and Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.