उद्धव ठाकरेंनी वंचितसोबत आघाडी केली मग मनसेशी युती का नाही?; संजय राऊत म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 15:43 IST2024-04-04T15:42:48+5:302024-04-04T15:43:28+5:30
Loksabha Election 2024: राज ठाकरे हे महायुतीसोबत जातील अशी चर्चा राजकारणात सुरू आहे. त्यात उद्धव ठाकरे पक्षफुटीनंतर अनेकांशी जुळवून घेतात मग राज ठाकरेंच्या मनसेसोबत का नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यावर संजय राऊतांनी थोडक्यात उत्तर दिले.

उद्धव ठाकरेंनी वंचितसोबत आघाडी केली मग मनसेशी युती का नाही?; संजय राऊत म्हणतात...
मुंबई - Sanjay Raut on Raj Thackeray-Uddhav Thackeray ( Marathi News ) राज्याच्या राजकारणात अनेकदा ठाकरे बंधुंनी एकत्र यावं अशी चर्चा झाली. मध्यंतरीच्या काळात शिवसेनेत फूट पडली. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय, त्यासाठी उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं अशी बॅनरबाजीही कार्यकर्त्यांकडून झाली. परंतु प्रत्यक्षात हे दोन्ही पक्ष कधीही एकत्र आले नाहीत. त्यात उद्धव ठाकरेंनी वंचित बहुजन आघाडीसोबतही जुळवून घेतले मग राज ठाकरेंच्या मनसेसोबत जाण्याची चर्चा का झाली नाही असा सवाल पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारला त्यावर राऊतांनी थोडक्यात उत्तर दिले.
संजय राऊत म्हणाले की, मनसेशी युती करावी अशी कधी चर्चा आमच्या पक्षात झाली नाही. काही लोकांनी हा विषय काढला होता. पण ज्यांनी काढला तेच पक्ष सोडून गेलेत. उद्धव ठाकरे-राज ठाकरे हे दोन भाऊ आहेत. ते भाऊ म्हणून एकत्रच आहेत. राजकीय मार्ग वेगळे आहेत. कुटुंब म्हणून भाऊ म्हणून जी नाती आहेत ती राहतातच. आमचेही दोघांसोबत संबंध आहेत. त्यात काय, महाराष्ट्र आणि मराठी माणूस इतका दिलदार आहे असं त्यांनी म्हटलं.
त्याशिवाय राज ठाकरे महायुतीसोबत गेले तर जाऊ द्या, त्यांना कोण अडवणार? अनेक वर्ष त्यांच्या चर्चा सगळ्यांशी सुरू असतात. पण कुठल्याही चर्चेत ते पुढे गेलेत असं दिसलं नाही. त्यांचा पक्ष आहे ते निर्णय घेतील. मुंबईत काहीही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडी ६ जागा जिंकेल. जर शिवसेना ५ जागा लढणार असेल तर काँग्रेसच्या १ जागेसह आम्ही सर्व जागा जिंकू अशी पूर्ण तयारी केली आहे असंही राऊतांनी सांगितले.
दरम्यान, राज ठाकरे हा देखील एक ठाकरे ब्रँड आहे तो महायुतीशी जोडला जाईल त्याने फरक पडेल का असा प्रश्न विचारलं असता, त्यांनी काहीच फरक पडणार नाही. हा तुमचा गैरसमज कित्येक वर्षाचा आहे तो आता दूर करायला हवा. ते त्यांचा पक्ष चालवतायेत, त्यांना त्यांचा पक्ष चालवू द्या असं उत्तर राऊतांनी दिले. एबीपी माझाच्या मुलाखतीत राऊत बोलत होते.