मराठी नेते परराज्यात करताहेत पडद्यामागील जोरदार हालचाली; प्रभारीं’ची रणनीती ठरणार निर्णायक

By यदू जोशी | Published: April 27, 2024 09:21 AM2024-04-27T09:21:07+5:302024-04-27T09:22:05+5:30

उत्तर प्रदेशमधील निकाल आश्चर्यकारक असतील, असा दावा काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रभारी अविनाश पांडे यांनी केला आहे.

Lok Sabha Election 2024 - Responsibility of various states on Marathi leaders in Congress-BJP | मराठी नेते परराज्यात करताहेत पडद्यामागील जोरदार हालचाली; प्रभारीं’ची रणनीती ठरणार निर्णायक

मराठी नेते परराज्यात करताहेत पडद्यामागील जोरदार हालचाली; प्रभारीं’ची रणनीती ठरणार निर्णायक

मुंबई : विविध राज्यांमध्ये आपापल्या पक्षांचे प्रभारी, सहप्रभारी म्हणून जबाबदारी मिळालेले मराठी नेते सध्या त्या-त्या राज्यात प्रचार यंत्रणेचे नियोजन करण्यात व्यग्र आहेत. यानिमित्ताने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.  

उत्तर प्रदेशमधील निकाल आश्चर्यकारक असतील, असा दावा काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रभारी अविनाश पांडे यांनी केला आहे. तर बिहारमधील समीकरणे भाजपच्या बाजूने असून तिथे ३५ हून अधिक जागा जिंकू, असा दावा भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी केला आहे.  

मुकुल वासनिकांकडे गुजरात
विदर्भातील बुलढाणा, रामटेकचे खासदार राहिलेले अ. भा. काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक हे काँग्रेससाठी अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या गुजरात राज्याचे प्रभारी आहेत. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने याठिकाणी सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या. तेथे पक्षाला उभारी देण्याचे प्रयत्न आता वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहेत.  

अविनाश पांडेंकडे उत्तर प्रदेश
अविनाश पांडे हे मूळ नागपूरचे, पण गेली दोन दशकेे ते राष्ट्रीय स्तरावरील पक्ष संघटनेत महत्त्वाची पदे भूषवत आहेत. त्यांच्याकडे यावेळी उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. आधी प्रियांका गांधी या उत्तर प्रदेशच्या प्रभारी होत्या, त्या जागी पांडे यांना पक्षश्रेष्ठींनी नेमले आहे. आतापर्यंत ४० लोकसभा मतदारसंघांमध्ये जाऊन त्यांनी मित्रपक्षांसह काँग्रेसच्या प्रचार यंत्रणेशी समन्वय साधला आहे. 

माणिकराव ठाकरेंकडे गोवा 
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यावर तेलंगणाचे प्रभारी म्हणून विधानसभा निवडणुकीत जबाबदारी होती, तेथे काँग्रेसचे सरकार बनले. आता लोकसभेसाठी ठाकरे हे गोवा, दादरा नगर हवेली, दिव-दमणचे प्रभारी आहेत. तेथे लोकसभेच्या चार जागा असून, काँग्रेसला निश्चितपणे गेल्यावेळेपेक्षा चांगले यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

विनोद तावडेंकडे संवेदनशील बिहार 
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे राजकीयदृष्ट्या संवेदनशील अशा बिहार राज्याची जबाबदारी आहे. तिथे भाजप-जदयु, लोकजनशक्ती पार्टी, हिंदुस्थान अवाम मोर्चा, राष्ट्रीय लोकमोर्चा अशी युती आहे. बिहारमध्ये नितीशकुमार यांना पुन्हा भाजपसोबत आणण्यात तावडे यांची भूमिका होती. तसेच आंध्रमध्ये चंद्राबाबू नायडूंना भाजपसोबत आणण्यातही त्यांची भूमिका राहिली. 

विजया रहाटकर, विनय सहस्रबुद्धेंकडे राजस्थान 
विजया रहाटकर या भाजपच्या राष्ट्रीय सचिव असून, राजस्थान भाजपच्या सहप्रभारी आहेत. पण तिथे पक्षाने प्रभारी नेमलेले नसल्याने ती जबाबदारीही रहाटकर यांच्याकडेच आहे. आधीच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा भाजपला देणाऱ्या राजस्थानमध्ये सहा ते सात जागांवर भाजप यावेळी अडचणीत असल्याचे म्हटले जाते. यावर रहाटकर म्हणाल्या की, राजस्थान पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सर्वच्या सर्व जागा भाजपला नक्कीच देईल. महाराष्ट्रातील विनय सहस्रबुद्धे यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राजस्थानचे निवडणूक प्रभारी म्हणून नेमले आहे. ते म्हणाले की, राजस्थानमध्ये जातीय अस्मिता टोकाच्या असतात. पण त्या पलीकडे जाऊन सर्वच समाज मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठीच कौल देतील, असा आमचा विश्वास आहे.  

Web Title: Lok Sabha Election 2024 - Responsibility of various states on Marathi leaders in Congress-BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.