"जुमलेबाजांना शिकवला धडा, संविधान बदलू पाहणारी प्रवृत्ती जनतेने केली हद्दपार’’, विजय वडेट्टीवार यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 14:06 IST2024-06-05T14:04:17+5:302024-06-05T14:06:33+5:30
Lok Sabha Election 2024: देशातील जनतेने लोकशाही वाचवली. पाशवी बहुमताच्या जोरावर संविधान बदलू पाहणारी प्रवृत्ती जनतेने हद्दपार केली असल्याची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी केली.

"जुमलेबाजांना शिकवला धडा, संविधान बदलू पाहणारी प्रवृत्ती जनतेने केली हद्दपार’’, विजय वडेट्टीवार यांचा टोला
मुंबई - काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी अथक परिश्रम घेऊन भारत जोडो यात्रा काढली. या यात्रेच्या करिष्म्यामुळे अभूतपूर्व यश मिळाले. भटकती आत्मा म्हणणाऱ्यांना आदरणीय पवार साहेबांनी 'बाप बाप होता है' हे दाखवून दिले. ज्यांनी उध्दव ठाकरे यांच्या सेनेला नकली सेना म्हणून हिणवले, त्यांना देखील जनतेने धडा शिकवला. महाविकास आघाडीच्या सामूहिक प्रयत्नांचे हे मोठे यश असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमित जनतेने जुमलेबाजांना गाडले आहे. देशातील जनतेने लोकशाही वाचवली. पाशवी बहुमताच्या जोरावर संविधान बदलू पाहणारी प्रवृत्ती जनतेने हद्दपार केली असल्याची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं अभिनंदन करून त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.
मुंबई येथील प्रचितगड या शासकीय निवासस्थानी आज वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी श्री. वडेट्टीवार यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर, लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या संदर्भाने सविस्तर चर्चा केली. यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशातील जनतेला संविधान आणि लोकशाही वाचविण्याची चिंता होती. त्यामुळे हे संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी जनतेने जुमलेबाज जोडीला बहुमत दिले नाही. सत्तेसाठी एकत्र आलेल्या जुमलेबाजांनी केंद्रीय यंत्रणांचा गैरवार करून पक्ष फोडले, विनाकारण नेत्यांना तुरूंगात डांबले. कायद्याचा गैरवापर केला. त्यामुळे जनतेने त्यांना धडा शिकवला. या सत्ताधाऱ्यांच्या संकटापुढे जे टिकले त्यांचं कौतुक आहे. परंतु जे गेले त्यांचं राजकारण संपणार आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, काँग्रेस संकटात असताना विदर्भातील जनता नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली आहे. तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम केल्याने विदर्भात महाविकास आघाडीचा मोठा विजय झाला. ज्या भागातून आमचे नेते राहूलजी गांधी यांची यात्रा गेली त्या ठिकाणी यश मिळाले. त्याचबरोबर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, आमच्या नेत्या प्रियांका गांधी, प्रभारी चेन्नीथला यांच्या सभा झाल्या त्या ठिकाणी देखील यश मिळालं आहे. याऊलट ज्या ठिकाणी मोदींच्या सभा झाल्या त्या ठिकाणी भाजपाचा दारुण पराभव झाला. त्यामुळे जनतेने राहुल गांधींच्या नेतृत्वावर विश्वास दाखविल्याचे सिद्ध झाले आहे.