४८ मतदारसंघात १२५ पेक्षा जास्त सभा; देवेंद्र फडणवीसांच्या सभेसाठी उमेदवारांचा आग्रह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 03:34 PM2024-04-16T15:34:32+5:302024-04-16T15:36:17+5:30

Lok sabha Election 2024 - राज्यात निवडणुकीच्या प्रचारात सर्वच उमेदवारांकडून स्टार प्रचारकांची मागणी होतेय. त्यात महायुतीकडून देवेंद्र फडणवीसांच्या सभांची मागणी जास्त आहे.

Lok Sabha Election 2024 - Demand for Devendra Fadnavis' campaign sabha from Mahayuti, Fadnavis will hold more than 125 Sabha in the state | ४८ मतदारसंघात १२५ पेक्षा जास्त सभा; देवेंद्र फडणवीसांच्या सभेसाठी उमेदवारांचा आग्रह

४८ मतदारसंघात १२५ पेक्षा जास्त सभा; देवेंद्र फडणवीसांच्या सभेसाठी उमेदवारांचा आग्रह

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी राज्यात सुरू झाली आहे. महाराष्ट्रात ५ टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा १७ तारखेला थंडावतील. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी, यासह वंचित बहुजन आघाडीही रिंगणात उतरली आहे. त्यामुळे या चुरशीच्या लढाईत जास्तीत जास्त प्रचार सभा घेण्याकडे राजकीय पक्षांचा कल आहे. यात देवेंद्र फडणवीस यांच्या सभेसाठी महायुतीचे उमेदवार आग्रही आहे. त्यामुळे राज्यातील ४८ मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांच्या १२५ हून अधिक सभांचे नियोजन करण्यात आले आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यातील मतदारसंघात १५ एप्रिलपर्यंत १६ सभा घेतल्या आहेत. राज्यात निवडणुकीचा शेवटचा टप्पा २० मे रोजी होणार आहे. त्यामुळे येत्या महिना भरात फडणवीसांच्या प्रचारसभांचा धडाका असाच सुरू राहणार असल्याचं सांगण्यात येते. प्रत्येक पक्षाकडून प्रचारासाठी स्टार प्रचारकांची नियुक्ती केली जाते. त्यात केंद्रीय नेते, मंत्र्यांसह अनेकांचा समावेश असतो. मोदी-शाह यांच्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या सभेसाठी उमेदवार आग्रही आहेत. फक्त भाजपाचे नाही तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांकडूनही फडणवीसांच्या प्रचाराची मागणी होत आहे. 

देवेंद्र फडणवीस केंद्रस्थानी

राज्यात मागील काही वर्षापासून देवेंद्र फडणवीस हे केंद्रस्थानी आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या हातून मुख्यमंत्रिपद निसटलं. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसनं मिळून सर्वाधिक जागा निवडून आलेल्या भाजपाला विरोधी बाकांवर बसण्यास भाग पाडलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी घेतली. त्यानंतर अवघ्या अडीच वर्षात राज्यात सत्तांतर घडलं. या घडामोडींमागे देवेंद्र फडणवीसच असल्याचं बोललं गेले. 

राज्यात आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची रंगत आहे. त्यात भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांची महायुती मिशन ४५ प्लसचं टार्गेट ठेवून काम करत आहे. त्यात जिंकण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारालाच तिकीट देण्याची रणनीती आखली जात आहे. अशावेळी काही मतदारसंघात उघड होत असलेली नाराजी, एकमेकांवरील कुरघोडी यातून चर्चेतून तोडगा काढण्यासाठी नेते देवेंद्र फडणवीसांची भेट घेतात. सुरुवातीला परभणीचे उमेदवार महादेव जानकर पवारांच्या गळाला लागल्याचं चित्र होतं. यात फडणवीसांनी राजकीय कसब दाखवत अचानक जानकरांना आपल्याकडे खेचलं. अजित पवार गटाला सुटलेल्या जागेची उमदेवारी मिळवून दिली. त्यानंतर बारामती मतदारसंघात नाराज असलेले विजय शिवतारे यांचीही समजूत काढण्यात देवेंद्र फडणवीसांनी भूमिका बजावल्याचं दिसून आले. 
 

Web Title: Lok Sabha Election 2024 - Demand for Devendra Fadnavis' campaign sabha from Mahayuti, Fadnavis will hold more than 125 Sabha in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.