काँग्रेस लोकांची दिशाभूल करण्याचं काम करतं; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 02:15 PM2024-04-15T14:15:09+5:302024-04-15T15:38:10+5:30

Nagpur Loksabha Election 2024 - नागपूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी हे सध्या प्रचाराच्या रणधुमाळीत व्यस्त आहेत. यात गडकरींनी सध्या राजकीय घडामोडी आणि विरोधकांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. 

Lok sabha Election 2024: Congress works to mislead people; BJP Nitin Gadkari allegations | काँग्रेस लोकांची दिशाभूल करण्याचं काम करतं; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं

काँग्रेस लोकांची दिशाभूल करण्याचं काम करतं; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं

नागपूर -  Nitin Gadkari on Congress ( Marathi News ) भाजपा सरकार येताच देशातील संविधान बदलणार अशाप्रकारे अपप्रचार करण्याचं काम विरोधक करतायेत. काँग्रेस यातून लोकांची दिशाभूल करतंय असं सांगत नागपूरचेभाजपा उमेदवार नितीन गडकरी यांनी संविधान बदलाच्या टीकेवरून स्पष्टच उत्तर दिले. 

लोकमत व्हिडीओचे संपादक आशिष जाधव यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत नितीन गडकरी म्हणाले की, भारताचं संविधान बदलणार असा सध्या अपप्रचार केला जात आहे. मुळात सुप्रीम कोर्टाच्या एका खंडपीठाने घटनेचा मूळ गाभा कधीच बदलता येत नाही असं सांगितले आहे. काँग्रेसनं आजपर्यंत ८० वेळा घटनेत दुरुस्ती केली आहे. मात्र भाजपा सरकार आल्यास संविधानात बदल होईल असं सांगून काँग्रेस दलित समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायेत. मुस्लीमांच्या मनात भीती निर्माण करतायेत. कुठलाही जातधर्म न बाळगता आम्ही काम करतोय. आज नागपूरकरांच्या प्रेमाचं ऋण कसं उतरवायचं हा प्रश्न माझ्या मनात आहे. इतकं प्रेम मला लोकांकडून मिळत आहे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच जात, पंथ भाषा यापलीकडे मी काम करतो. जातीपलीकडे जाऊन मी काम करतोय. माणूस जातीने नव्हे तर कर्तृत्वानं मोठा असतो. ज्यांनी मला मते दिली त्यांचीही आणि ज्यांनी मते दिली नाहीत त्यांचीही कामे करेन असं मी नेहमी बोलतो. जे लोक आपल्या कामाने निवडून येत नाहीत ते जाती आणि धर्माचा आधार घेतात. मी महाराष्ट्राचा दिल्लीत प्रतिनिधी आहे. ५ लाख कोटी मी माझ्या विभागातून महाराष्ट्राला दिलेत. नागपूरच्या जनतेचा खासदार असल्याने त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे माझी जबाबदारी आहे असंही नितीन गडकरींनी सांगितलं. 

दरम्यान, गेल्या १० वर्षात १ लाख कोटींची कामे नागपूरात झाली. प्रदुषणमुक्त, स्वच्छ सुंदर शहर करण्याचं स्वप्न आहे. नागपूरात २५० गार्डन, ३५० खेळाची मैदाने आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात २ स्विमिंग टँक, ऑडिटोरिएम यातून नागपूरचा सांस्कृतिक, क्रिडा क्षेत्रात विकास झाला पाहिजे. नागपूर आता शैक्षणिक हब होतंय. सिम्बॉसिस, ४९ इंजिनिअर कॉलेज, IIT, एम्ससारखे प्रकल्प आलेत. संपूर्ण विदर्भाला शेतकऱ्यांच्या आत्महत्येपासून मुक्त करायचं, अॅग्रो व्हिजनच्या माध्यमातून सिंचन, नैसर्गिक शेती यासारखे अनेक कामे सुरू आहेत. मोदींच्या नेतृत्वात १० वर्षाच्या कामगिरीचा चांगला परिणाम देशात दिसेल. भाजपा ३७० आणि एनडीए ४०० जागांच्या पार नक्की जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आहेत. मोदींच्या नेतृत्वात आमचं सरकार येईल असा विश्वास नितीन गडकरींनी व्यक्त केला.

राजकारणापेक्षा समाजकारण करतो

योग्य काम झालं पाहिजे, प्रत्येकाचं काम करतो, त्यात राजकारण नाही. लोकशाहीतील प्रगल्भ भावना त्यामागे आहे. मी सामाजिक कार्यकर्ता आहे. राजकारणापेक्षा समाजकारण, विकासकारण करतो, ४५ हजारापेक्षा जास्त हृदयविकाराच्या रुग्णांना मदत केलीय. कोविड काळात १०० कोटींचे साहित्य आणले, विमानातून ऑक्सिजन ट्रक आणलेत. समाजसेवा यालाच मी राजकारण म्हणतो. सिकलसेल ॲनिमिया आणि थॅलेसेमिया हा इथला फार मोठा रोग आहे. अवयव प्रत्यारोपणाची व्यवस्था आम्ही इथं आणतोय.  एम्समुळे इथल्या गरीब लोकांना कुठेही जाण्याची गरज भासणार नाही असं गडकरींनी सांगितलं. 

मतभिन्नता असावी, मनभेद नको

लोकशाहीत सत्तारुढ आणि विरोधक दोघांचीही भूमिका महत्त्वाची आहे. आपली लोकशाही जगातील सर्वात मोठी आहे. मतभिन्नता असली पाहिजे मनभेद नाहीत. राजकारणात गुणात्मक बदल व्हावेत. यासाठी लोकशाहीच्या ४ घटकांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. विचार, सिद्धांताच्या आधारावर, मतदारसंघातील कामगिरीच्या आधारे विचार करायला हवा असं नितीन गडकरींनी राजकीय नेत्यांना सल्ला दिला. 

त्याचसोबत राजकारण आणि व्यक्तिगत संबंध वेगळे आहेत. मी ज्याचा मैत्रीचा हात पकडला तो कायम ठेवला आहे. सरकार बदलत राहतील, आघाड्या बदलत राहतील. व्यक्तिगत संबंध तसेच कायम राहतील यावर माझा विश्वास आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे स्थान माझ्या हृदयात आहे. आजही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसोबत माझे कौटुंबिक संबंध आहेत. राजकारणातले मतभेद बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र येण्याबाबत ही लोकशाहीतील प्रगल्भता देशात  महाराष्ट्र प्रस्थापित करू शकतो. कारण तेवढी सुदृढ परंपरा महाराष्ट्रात आहे. राजकारणात निवडणूक लढवाव्यात, टीका टिप्पणी करावी. आपण एकमेकांचे शत्रू नाही. वैचारिक मतभिन्नता आहे असं समजून काम करायला हवे असं भाष्यही गडकरींनी केले. 
 

Web Title: Lok sabha Election 2024: Congress works to mislead people; BJP Nitin Gadkari allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.