Leopard Attack: नागपुरात बिबट्याची दहशत! पारडी भागात पहाटे चौघांवर हल्ला; रेस्क्यू ऑपरेशन सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 09:43 IST2025-12-10T09:42:06+5:302025-12-10T09:43:02+5:30
Nagpur Leopard Attack News: महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Leopard Attack: नागपुरात बिबट्याची दहशत! पारडी भागात पहाटे चौघांवर हल्ला; रेस्क्यू ऑपरेशन सुरू
महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागपूर, नाशिक, रायगड आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, आज पहाटे नागपूर शहरातील पारडी भागात बिबट्याने अचानक काही नागरिकांवर हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. बिबट्याच्या हल्ल्यात चार जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी एक बिबट्या कापसी भागात दिसला होता. हल्ला केल्यानंतर हा बिबट्या पारडी भागातील एका दुमजली इमारतीत लपला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस मोठे प्रयत्न करत आहेत. लवकरच बिबट्याला जेरबंद केले जाईल, असा विश्वास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
बिबट्याच्या हल्ल्यानंतर नागरिकांमध्ये संताप
या हल्ल्यानंतर नागरिकांमध्ये वनविभागाच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र संतापाची लाट उसळली आहे. यापूर्वी पारडी परिसरात दोन बिबट्यांनी दहशत निर्माण केली होती, त्यापैकी एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले. परंतु, दुसऱ्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला अपयश आले. एका संतप्त नागरिकाने आरोप केला आहे की, "हा बिबट्या वेळीच पकडला गेला असता तर, आज अनेकांना जखमी होण्यापासून वाचवता आले असते."
बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
बिबट्याला पकडण्यासाठी सुरू असलेल्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्या इमारतीत बिबट्या लपल्याचा संशय आहे, त्याच्या जवळील इमारतीच्या गच्चीवर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. वनविभागाने नागरिकांना गर्दी न करण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.