शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 21:27 IST2024-05-01T21:26:32+5:302024-05-01T21:27:19+5:30
Uddhav Thackeray News: भाजपाच्या व्हायरसपासून दूर राहा. आमच्या मशालीला हात घालू नका नाही, तर भस्मसात व्हाल, असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
Uddhav Thackeray News: मोदींनी महाराष्ट्राशी द्रोह केला, गद्दारी केली. मोदी सरकार बदलत आहे, हे आता जगभर झाले आहे. हे मोदी सरकार नाही गजनी सरकार आहे. काल काय बोलले, ते आज आठवत नाही, काय आश्वासन दिली ते कळत नाही. फुटबॉल सामन्यात होते तसे मोदी दररोज सेल्फ गोल मारतात. मोदीजी गाय पे चर्चा करता, जरा महागाईवर पण बोला, या शब्दांत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले.
लोकसभा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना दिसत आहेत. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी गेल्या निवडणुकीत नवनीत राणा यांना समर्थन, पाठिंबा दिल्याबाबत माफी मागितली होती. २०२४ च्या निवडणुकीत भाजपाने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. यानंतर आता शरद पवारांच्या पाऊलावर पाऊल ठेवत उद्धव ठाकरे यांनीही मतदारांची माफी मागितली आहे. त्याला (धैर्यशील माने) निवडून देण्यासाठी मते मागितली होती, यासाठी मी माफी मागतो. वाटले नावाप्रमाणे असेल, पण धैर्य हरणारा माणूस पाहिला नाही. याने, तर डबल गद्दारी केली. गद्दारांचे दोन बापही महाराष्ट्राचे गद्दार आहेत, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला.
भाजपाच्या व्हायरसपासून दूर रहा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हे मानायला तयार नाही. मोदीजी गुजरातमध्ये भटकता आत्मा शोधा, महाराष्ट्रात शोधू नका. आमच्या मशालीला हात घालू नका नाही, तर भस्मसात व्हाल, असा थेट इशारा देताना, कोरोना काळात सांगत होतो की, त्या व्हायरसपासून दूर रहा. आज सांगतो की, भाजपाच्या व्हायरसपासून दूर रहा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, सुरतचे दोघे महाराष्ट्र लुटत आहेत. पण या लुटारुंचा सुफडासाफ केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा निर्धार उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवला.