शरद पवार ‘मॅन ऑफ द सिरीज’; निकालानंतर जितेंद्र आव्हाड भेटीला, घातले साष्टांग दंडवत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 13:06 IST2024-06-05T13:03:23+5:302024-06-05T13:06:26+5:30
Jitendra Awhad Meet Sharad Pawar: लोकसभा निवडणूक निकालात महाविकास आघाडीने बाजी मारल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांची भेट घेतली.

शरद पवार ‘मॅन ऑफ द सिरीज’; निकालानंतर जितेंद्र आव्हाड भेटीला, घातले साष्टांग दंडवत
Jitendra Awhad Meet Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत महायुतीला अनेक ठिकाणी चितपट केले. महाविकास आघाडीला राज्यात २९ ठिकाणी विजय मिळवता आला. तर महायुतीला १८ जागांवर समाधान मानावे लागले. एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटाने वेगवेगळी निवडणूक लढवली. त्यात शरद पवार गटाला ८ जागांवर विजय मिळवला.
राज्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांना साष्टांग दंडवत घालून त्यांचे पाय धरले. याचा एक व्हिडिओ खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना, शरद पवार ‘मॅन ऑफ द सिरीज’, असे कॅप्शनही दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने लोकसभेच्या १० जागांवर उमेदवार दिले होते. त्यापैकी ०८ जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले. विशेष म्हणजे राज्याचे नाही, तर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. सुनेत्रा पवार यांचा लाखांच्या मताधिक्क्याने पराभव केला. तसेच शिरूर येथे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी विजयी परंपरा कायम ठेवली. याशिवाय बीड, भिवंडी, अहमदनगर, दिंडोरी, माढा, वर्धा या ठिकाणी शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले.
दरम्यान, महाराष्ट्रात काँग्रेस मोठा पक्ष ठरला. काँग्रेसला १३, भाजपा ९, शिवसेना ठाकरे गट ९, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ८, शिवसेना शिंदे गट ७, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट १, अपक्ष १ अशा जागांवर उमेदवार निवडून आले.
He is the man of the series
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 4, 2024
His name is #SharadPawarpic.twitter.com/a9v72Pa6y1