'तुमच्याकडे चाणक्य तर आमच्याकडं तालमीतला बाप आहे'; नवाब मलिकांचे भाजपवर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 13:15 IST2021-11-11T13:15:05+5:302021-11-11T13:15:20+5:30
परभणीत काँग्रेसला खिंडार, 10 नगरसेवक राष्ट्रवादीत सामील

'तुमच्याकडे चाणक्य तर आमच्याकडं तालमीतला बाप आहे'; नवाब मलिकांचे भाजपवर टीकास्त्र
परभणी: राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. तुमच्याकडे चाणक्य आहे, तर आमच्याकडे तालमीतला बाप आहे, अशी जहरी टीका नवाब मलिक यांनी केली आहे. ते परभणीत एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी परभणी जिल्ह्यातील सोनपेठ नगरपालिकेतील काँग्रेसच्या 10 नगरसेवकांनी मलिकांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
आम्ही ईडी-सीबीआयचा सामना करू
परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक म्हणाले की, परभणी हा पहिल्यापासूनच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. महाविकास आघाडी सरकारच्यावतीने जिल्ह्यातील अनेक कामे केली. अनेक प्रश्न सोडवले आहेत, कोरोनामध्ये होम क्वारंटाईन असेल या कोविड बाबत अनेक कामे केली करण्यात आली. राज्यात सत्तांतर होण्यापूर्वी भाजपची दडपशाही होती. अर्धे लोक तुरुंगात जातील असं ते म्हणतात मात्र आम्ही घाबरत नाही. आमच्या नेत्यांच्या मागं ईडी आणि सीबीआय लावली आहे, त्याचा सामना करु, असं मलिक म्हणाले.
आमच्याकडे तालमीतला बाप
भाजपकडून विधानसभा निवडणुकीत कट कारस्थान करण्यात येत होतं, शरद पवार साहेब संपले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. काही जण तुमच्याकडे चाणक्य आहे, असं म्हणतात मात्र, आमच्याकडे तालमीतला बाप आहे. आम्ही कोणाला घाबरत नाही, आम्ही झोपतो पण आणि झोप उडवतो पण, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला. नव्यानं लोक या पक्षात येतात त्यामुळे या पक्षात कोणताही नवा जुना वाद होणार नाही, याची काळजी घ्या, असंही नवाब मलिक म्हणाले.
राष्ट्रवादीचा राजेश विटेकर यांना पाठिंबा
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यक्रमात बोलताना परभणीत चंद्रकांत राठोड यांच्यामुळे सर्व बदल झाल्याचं दिसून येत असल्याचं म्हटलं. तसेच, परभणीतील राष्ट्रवादीची ताकद पाहता या जिल्ह्यात आपला खासदार निवडून येऊ शकतो, असंही ते म्हणाले. शरद पवार यांना तरुण नेतृत्व दिल्लीला जावे असे पवार साहेबांना वाटत होते. राजेश विटेकर यांना आम्ही सतत सांगत आलो तुम्ही काम करत रहा. राजेश विटेकर यांच्या मागे सर्व राष्ट्रवादीचे लोक आहेत, असंही पाटील म्हणाले.