सरकार आल्यास सहा महिन्यांत आदिवासींच्या जागा परत करणार; राहुल गांधींनी दिली गॅरंटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 05:45 IST2024-03-16T05:43:09+5:302024-03-16T05:45:03+5:30
केंद्र सरकारने उद्योजकांची १६ हजार कोटींची कर्जे माफ केली. मात्र, शेतकरी, आदिवासी, विद्यार्थी यांची कर्जे सरकारने माफ केली का, असे विचारत हे अरबपतींचे सरकार असल्याचा घणाघात राहुल गांधींनी केला.

सरकार आल्यास सहा महिन्यांत आदिवासींच्या जागा परत करणार; राहुल गांधींनी दिली गॅरंटी
लोकमत न्यूज नेटवर्क, वाडा (जि. पालघर) : आदिवासी हे येथील मूळ रहिवासी असून, त्यांच्या जागा उद्योजकांनी ताब्यात घेतल्या आहेत. आमचे सरकार आल्यास सहा महिन्यांतच आदिवासींच्या जागा त्यांना परत करू, अशी गॅरंटी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पालघर जिल्ह्यातील वाडा येथे दिली. याचबरोबर वनखात्याची जमीन तसेच जंगलावर आदिवासींचाच अधिकार असेल, ही आम्ही गॅरंटी देतो, असेही ते म्हणाले.
पालघर जिल्ह्यातील ‘भारत जोडो न्याय यात्रे’ची सुरुवात शुक्रवारी सकाळी मोखाडा येथून करण्यात आली. त्यानंतर जव्हार, विक्रमगड व नंतर वाडा शहरातील खंडेश्वरी नाका येथे राहुल गांधी यांनी जनतेशी संवाद साधला. भारतात ५० टक्क्यांपेक्षा जास्त गरिबीचे प्रमाण असून, त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रत्येक वर्षाला गरीब कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यात एक लाख रुपये देऊन गरिबी हटवण्यात येईल, असेही आश्वासन त्यांनी दिले.
‘अग्निवीर’वर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकारने जवानांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले आहे, तर चीनच्या जवानांना पाच वर्षे प्रशिक्षण दिले जाते. या दोघांमध्ये सहा महिन्यांचा प्रशिक्षणवाला की पाच वर्षांचा प्रशिक्षणवाला टिकेल, असा सवाल त्यांनी नागरिकांना विचारला.
शेतकरी-आदिवासींची कर्जे माफ केली?
- केंद्र सरकारने उद्योजकांची १६ हजार कोटींची कर्जे माफ केली. मात्र, शेतकरी, आदिवासी, विद्यार्थी यांची कर्जे सरकारने माफ केली का, असे विचारत हे अरबपतींचे सरकार असल्याचा घणाघात त्यांनी केला.
- भिवंडी, वाडा, मनोर, कुडूस या नाक्यांवर राहुल गांधी यांचे स्वागत करण्यासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.