“प्रभू रामचंद्र मित्रपक्षापासून CM शिंदेंचे रक्षण करो”; माजी मंत्र्यांनी दिला पक्षाचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 22:30 IST2024-04-25T22:29:34+5:302024-04-25T22:30:01+5:30
Suresh Navale News: भाजपावर जोरदार टीका करत शिंदे गटाच्या माजी मंत्र्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त केली.

“प्रभू रामचंद्र मित्रपक्षापासून CM शिंदेंचे रक्षण करो”; माजी मंत्र्यांनी दिला पक्षाचा राजीनामा
Suresh Navale News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे प्रचार, बैठका, मेळावे यांची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटातील एका माजी मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत, पक्षाचा राजीनामा दिला आहे. छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री सुरेश नवले यांनी प्रातिनिधिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपाच्या दबावाखाली असल्याचा दावा सुरेश नवले यांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मित्रपक्षाचा दबाव झुगारून जे सोबत आले, त्यांना उमेदवारी देणे अपेक्षित होते. कृपाल तुमानी, हेमंत पाटील, भावना गवळी यांचा बळी गेला. कदाचित हेमंत गोडसे यांचाही बळी जाण्याची शक्यता आहे. हे चित्र कशाचे प्रतिक आहे, अशी विचारणा नवले यांनी केली. तसेच जे शिवसैनिक तुमच्या सोबत आले, ते मित्र पक्षाच्या दबावामुळे आले, तुम्ही त्यांना न्याय देत नाहीत असा महाराष्ट्रात चुकीचा संदेश जात आहे. शिवसेना शिंदे गटाच्या खांद्यावर बसून भाजपावाले सत्तेची फळ चाखत आहेत. एकनाथ शिंदेनी उठाव केला म्हणून सत्तेच्या पालखीत भाजपला बसता आले. नाहीतर भाजपाला रस्त्यावरती मोर्चे काढावे लागले असते, उपोषण करावे लागले असते, अशी टीका सुरेश नवले यांनी केली. नवले मीडियाशी बोलत होते.
प्रभू रामचंद्र मित्र पक्षापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे रक्षण करो
शिवसेनेने नेते व उपनेते यांच्या भावना व्यक्त केल्या. ज्यांनी आपले स्वतःचे आयुष्य पणाला लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले होते. मुख्य नेता म्हणून त्यांची निवड केली. त्यांना साधी लोकसभेची उमेदवारी मिळू शकली नाही, ही त्यांच्या आयुष्यातील शोकांतिका आहे. पक्ष चालवत असताना मित्र पक्षाच्या दबावाला बळी पडू नाही. आपला पक्षांच्या सैनिकांना न्याय दिला पाहिजे. जर त्यांना न्याय मिळत नसेल, तर त्यांनी कोणाकडे पाहेच हा प्रश्न निर्माण होतो. प्रभू रामचंद्राला साकडे घालतो की, मित्र पक्षांपासून आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संरक्षण करो, या शब्दांत सुरेश नवले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, नाशिकची उमेदवारी या क्षणापर्यंत का जाहीर झाली नाही? हेमंत गोडसेंना पाच वेळेस शक्तिप्रदर्शन करावे लागले. जे तुमच्या सोबत आले त्यांना एक क्षणाचा विलंब न करता त्यांना उमेदवारी मिळायला हवी होती. अनेकांच्या मनात अशीच खदखद आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर शिवसैनिक आणि जनता याचे उत्तर देईल, असा इशारा सुरेश नवले यांनी दिला.