सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादीनेही आमचं कामच केलं नाही; संजय राऊतांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 02:11 PM2024-06-23T14:11:28+5:302024-06-23T14:12:42+5:30

मविआतील जागावाटपाबाबत अजून कुठलीही चर्चा नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा स्ट्राईक रेट बेईमानी आणि गद्दारीत चांगला, त्यांनी पैशावर जागा जिंकल्या असा आरोप संजय राऊतांनी केला. 

Even the Congress-NCP did not do our work in Sangli; Sanjay Raut allegation | सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादीनेही आमचं कामच केलं नाही; संजय राऊतांचा आरोप

सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादीनेही आमचं कामच केलं नाही; संजय राऊतांचा आरोप

 नाशिक - शिवसेना २१ जागा लढली, त्यातील काही जागा, सांगलीतील जागेवर काँग्रेस-राष्ट्रवादीने कामच केले नाही. त्यामुळे आम्ही २० जागाच लढलो, ठाणे, कल्याण डोंबिवलीत संपूर्ण शासकीय प्रशासकीय यंत्रणा आमच्याविरोधात काम करत होती. केंद्राकडून सगळ्यात जास्त टार्गेट आम्हाला करण्यात आले, त्याचा फटका आम्हाला बसला. त्यामुळे स्ट्राईक रेट हा विषय कोणी ठेवू नये. आम्ही तिघे एकत्रित लढलो आणि तिघांचा एकत्रित स्ट्राईक रेट चांगलाय असं विधान खासदार संजय राऊत यांनी करत काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गटाला सूचक इशारा दिला आहे. नाशिक येथे ते पत्रकारांशी बोलत होते. 

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात २८८ जागा आहेत. त्यामुळे २८९ जागा कुणी घेऊ शकत नाही. आम्ही तिघे एकत्रित बसू आणि जागावाटपावर चर्चा करू. लोकसभेत अनेक जागांवर गैरसमजाने मतदान झाले. राज्यातील लोकांनी चुकून धनुष्यबाणाला मतदान केले. लाखो मते बनावट शिवसेनेला गेली. मुख्यमंत्र्यांचा स्ट्राईक रेट बेईमानी आणि गद्दारीचा चांगला आहे. पैशाने स्ट्राईक रेट वापरून त्यांनी जागा जिंकल्या.मुंबईच्या जागेवर स्ट्राईक रेटवाल्यांनी दरोडा टाकला. आमच्या काही जागा हातातोंडाशी आलेल्या गेल्यात असा आरोप त्यांनी केला.

तसेच महाविकास आघाडीची उद्या बैठक नाही. बैठक होती,परंतु महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक आहे. त्यामुळे बहुतेक सर्व नेते दिल्लीत आहेत. जागावाटपावर अजून चर्चा झाली नाही. शरद पवारांचा स्ट्राईक रेट सगळ्यात चांगला आहे. १० जागा ते लढले त्यातील ८ जागा जिंकल्या हे खरे आहे असंही संजय राऊतांनी सांगितले. 

दरम्यान, केंद्रात १०० च्या वर जागा आहेत ज्या भाजपा ५०० ते १५०० या फरकाने जिंकला आहे. त्यातील बहुसंख्य जागा प्रशासनावर दबाव आणून विजयी करून घेतल्या. धुळ्याची जागा विजयी घोषित करावी असा दबाव केंद्राचा तिथल्या प्रशासनावर होता. शेवटी ती जागा काँग्रेसनं जिंकली. ६० ईव्हीएम मशिनची मोजणी बाकी असताना विजयी घोषित करा यासाठी भाजपा नेते प्रयत्नात होते. धुळ्याची जागा भाजपा लुटण्याच्या प्रयत्नात होती परंतु काँग्रेसच्या सतर्कतेमुळे पुन्हा त्या पेट्या मोजल्या गेल्या आणि काँग्रेस जिंकली. अशाप्रकारे १०० च्यावर जागा मोदी-शाह यांच्या भाजपानं ओरबडल्या आहेत. हे सरकार अस्थिर आहे. ज्यादिवशी हे सरकार कोसळेल तेव्हा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर पहिली कारवाई होईल असा इशारा संजय राऊतांनी दिला. 

Web Title: Even the Congress-NCP did not do our work in Sangli; Sanjay Raut allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.