ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर; तासाभरात अमोल कीर्तिकरांना ईडी नोटीस, पथक बंगल्यावर पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 11:27 AM2024-03-27T11:27:22+5:302024-03-27T11:31:28+5:30

ED Notice To Amol Kirtikar: ठाकरे गटाने वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली असून, काही तासांतच ईडीने नोटीस बजावत झाडाझडतीला सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे.

enforcement directorate issues notice to thackeray group leader amol kirtikar after declare as mumbai lok sabha election 2024 candidate | ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर; तासाभरात अमोल कीर्तिकरांना ईडी नोटीस, पथक बंगल्यावर पोहोचले

ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर; तासाभरात अमोल कीर्तिकरांना ईडी नोटीस, पथक बंगल्यावर पोहोचले

ED Notice To Amol Kirtikar: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी यादी जाहीर करण्यात येत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पहिली १७ उमेवादारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुंबईतून चार जणांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, उमेदवारी जाहीर होण्याच्या अवघ्या तासाभरात अमोल कीर्तिकर यांना सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने नोटीस बजावली आहे. ईडी अधिकाऱ्यांचे एक पथक अमोल कीर्तिकर यांच्या बंगल्यावर पोहोचले असून, झाडाझडती सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे. 

ठाकरे गटाचे वायव्य मुंबईतील उमेदवार अमोल कीर्तिकर यांना ईडीने नोटीस बजावली आहे. ईडी अधिकाऱ्यांच्या एका पथकाने अमोल कीर्तिकर यांच्या दापोलीतील बंगल्यावर धाड टाकली आहे. दापोली तालुक्यातील शिर्दे या गावात ईडीचे अधिकारी दाखल झाले. यानंतर या गावातील अमोल कीर्तिकर यांच्या बंगल्यावर जात झाडाझडती सुरू केली, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 

ईडीच्या कारवाईवरून विरोधकांकडून सडकून टीका करण्यात येते. यातच ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केल्याच्या काही तासांत अमोल कीर्तिकर यांना बजावण्यात आलेल्या नोटिसीमुळे पुन्हा एकदा ईडीच्या टायमिंगवर चर्चा सुरू झाली आहे. अमोल कीर्तिकर यांना दिवसभरात हजर राहण्याचे निर्देश ईडीकडून देण्यात आल्याची माहिती आहे. दुसरीकडे ईडीचा ससेमिरा मागे लागल्याने अलीकडेच काही नेत्यांनी पक्षांतराची भूमिका घेतली होती. 

दरम्यान, अमोल कीर्तिकर हे गजानन कीर्तिकर यांचे पुत्र आहेत. गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला असला तरी अमोल कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ठाकरे गटात राहणे पसंत केले. अमोल कीर्तिकर यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. त्याप्रमाणे ठाकरे गटाने वायव्य मुंबई येथून अमोल कीर्तिकर यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. या जागेवर शिंदे गटाकडून गजानन कीर्तिकर इच्छूक असल्याचे तर्क-वितर्क लढवले जात होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पिता-पुत्रांची लढत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. 

 

Web Title: enforcement directorate issues notice to thackeray group leader amol kirtikar after declare as mumbai lok sabha election 2024 candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.