"मी तर शपथ घेणार आहे..."; उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार बनवणार नवा रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 09:24 IST2024-12-05T09:23:13+5:302024-12-05T09:24:30+5:30

सर्वाधिक उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवारांनी अनेकदा मुख्यमंत्रि‍पदाची इच्छा जाहीर बोलून दाखवली आहे.

Devendra Fadnavis Oath Ceremony: Ajit Pawar will make a new record as Deputy Chief Minister as 6 times | "मी तर शपथ घेणार आहे..."; उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार बनवणार नवा रेकॉर्ड

"मी तर शपथ घेणार आहे..."; उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार बनवणार नवा रेकॉर्ड

मुंबई - महाराष्ट्रात आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. त्यांच्यासोबत अजित पवार हेदेखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अद्याप एकनाथ शिंदे यांच्याकडून अधिकृत भूमिका जाहीर झाली नाही मात्र तेदेखील उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अशी शिवसेनेतील सूत्रांची माहिती आहे. आजच्या शपथविधी सोहळ्यात अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथेनंतर आणखी एक रेकॉर्ड तयार होणार आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे अजित पवार हे एकमेव नेते आहेत त्यामुळे त्यांच्या नावावर हा रेकॉर्ड बनणार आहे.

कायद्यात उपमुख्यमंत्रिपदाची कुठलीही वेगळी तरतूद नाही परंतु सत्ता समीकरणे साधण्यासाठी राजकीय पक्षांकडून मुख्यमंत्र्यानंतर उपमुख्यमंत्री अशी व्यवस्था तयार केली आहे. मुख्यमंत्र्यानंतर कॅबिनेट मंत्रालय असणाऱ्या नेत्याला उपमुख्यमंत्रिपद सोपवले जाते. सध्या देशातील १४ राज्यात २३ उपमुख्यमंत्री आहेत. देशात पहिले उपमुख्यमंत्री म्हणून अनुग्रह नारायण सिन्हा यांचं नाव समोर येते. स्वातंत्र्यानंतर जुलै १९५७ साली बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदी अनुग्रह सिन्हा होते. त्यांच्यानंतर १९६७ साली कर्पुरी ठाकूर हे बिहारचे दुसरे उपमुख्यमंत्री बनले. 

"मी तर शपथ घेणार आहे..." 

महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणात अजित पवार पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. बुधवारी राजभवनावरील पत्रकार परिषदेत एकाने एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारला की, तुम्ही आणि अजितदादा उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहात का? त्यावर संध्याकाळपर्यंत धीर धरा, सगळं काही समजेल असं शिंदेंनी उत्तर दिले त्याचवेळी अजित पवारांनी संध्याकाळपर्यंत त्यांचे काय ते समजेल पण मी उद्या शपथ घेणार आहे. अजितदादांच्या या उत्तरावर पत्रकार परिषदेत हशा पिकला. इतक्यात शिंदेंनीही दादांना सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी शपथ घेण्याचा अनुभव आहे असं म्हटलं. पुन्हा दादांनी मागे आम्ही काही दिवसांसाठी आलो आता ५ वर्ष कायम राहणार आहे असं उत्तर दिले.

७२ तासांसाठी उपमुख्यमंत्री बनले होते अजितदादा

अजित पवार महायुती सरकारमध्ये २०२३ पासून उपमुख्यमंत्री आहेत. त्याआधी २०१९ मध्ये राजकीय नाट्यमय घडामोडीत अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली होती. मात्र ७२ तासांतच त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर पुन्हा महाविकास आघाडीत सहभागी होत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मविआ सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 

मुख्यमंत्रि‍पदाची इच्छा, पण गणित जुळले नाही

सर्वाधिक उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवारांनी अनेकदा मुख्यमंत्रि‍पदाची इच्छा जाहीर बोलून दाखवली आहे. मला मुख्यमंत्री बनायचंय पण माझी गाडी उपमुख्यमंत्रिपदावर अटकते त्याला काय करणार असं अजित पवार मजेत बोलतात. अजित पवार यांना मुख्यमंत्री बनण्यासाठी अजूनपर्यंत तरी राजकीय गणित जुळले नाही. आतापर्यंत अजित पवार ५ वेळा उपमुख्यमंत्री बनलेत, आज ते सहाव्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. अजितदादांनी ४ मुख्यमंत्र्‍यांच्या नेतृत्वाखाली काम केलेय, त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ते दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री होणार आहे. 

Web Title: Devendra Fadnavis Oath Ceremony: Ajit Pawar will make a new record as Deputy Chief Minister as 6 times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.