सस्पेंस संपला! अमित शाह मुंबईत येण्यापूर्वी शिंदेंनी घेतला मोठा निर्णय; राजभवनावर पत्र जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 14:23 IST2024-12-05T14:23:15+5:302024-12-05T14:23:47+5:30
Eknath Shinde Oath News: आता शिंदे राजी जरी झालेले असले तरी त्यांना कोणते खाते देण्याचा शब्द देण्यात आला आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. परंतू, थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सह्याद्री अतिथीगृहावर येणार आहेत.

सस्पेंस संपला! अमित शाह मुंबईत येण्यापूर्वी शिंदेंनी घेतला मोठा निर्णय; राजभवनावर पत्र जाणार
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी राजी झाले आहेत. अखेर गेल्या १२ दिवसांपासून सुरु असलेले नाराजीनाट्य संपुष्टात आले आहे. शिवसेनेच्या आमदारांनी शिंदेंची भेट घेऊन तुम्ही उपमुख्यमंत्री नाही तर आम्ही मंत्री होणार नाही, अशी भुमिका घेतली होती. त्यास यश आले आहे.
मुख्यमंत्री पदी २.५ वर्षे घालविल्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री होणे शिंदेंना पटले नसावे, परंतू आता ते उपमुख्यंत्री होण्यास राजी झाले आहेत, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यावरूनही शिंदे नाराज झाल्याचे वृत्त होते. तसेच शिंदेंनी गृहमंत्री पद व अर्थमंत्री पद मागितल्याचेही सांगितले जात होते. परंतू, याला भाजपाने होकार दिलेला नव्हता.
आता शिंदे राजी जरी झालेले असले तरी त्यांना कोणते खाते देण्याचा शब्द देण्यात आला आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. परंतू, थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सह्याद्री अतिथीगृहावर येणार आहेत. तिथे शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक होणार आहे. या बैठकीत खातेवाटपावर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सायंकाळी देवेंद्र फडणवीसांबरोबर शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यामुळे शिंदे उपमुख्यमंत्री होणार का किंवा दोनच जण शपथ घेणार का शक्यतांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते. उदय सामंत, भरत गोगावले, संजय शिरसाट, दीपक केसरकर, संजय गायकवाड यांच्यासह काही आमदार आले होते.