“भाजपाच्या पायाखालची वाळू सरकलीय, कितीही सभा घेतल्या तरी विजय मविआचा होईल”: विजय वडेट्टीवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 12:55 IST2024-04-08T12:54:39+5:302024-04-08T12:55:27+5:30
Vijay Wadettiwar News: भाजपाच्या सभा लोक फक्त ऐकायला जातात, पण मतदान करत नाही, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

“भाजपाच्या पायाखालची वाळू सरकलीय, कितीही सभा घेतल्या तरी विजय मविआचा होईल”: विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar News: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदार अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विदर्भातील सहा जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी चंद्रपुरात येत आहेत. चंद्रपूर येथे पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीका केली आहे. भाजपाच्या पायाखालील वाळू सरकली आहे. कितीही प्रचार केला, सभा घेतल्या, तरी महाविकास आघाडीचाच विजय होईल, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
मीडियाशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सत्ता टिकवण्यासाठी कितीही सभा घेतल्या तरी जनता त्यांना स्वीकारणार नाही. विजय महाविकास आघाडीचा होणार आहे. लोक फक्त ऐकायला जातात, पण मतदान करत नाही, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे. एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जाणार आहेत. यावर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, गळ्याला फास लागला बिचारे काय करणार? या वयात अधिक त्रास सहन करण्यापेक्षा, पक्षबदलाची भूमिका त्यांनी घेतली.
राणा कुणाच्या भरवशावर निवडून आल्या?
नवनीत राणा यांच्या उमेदवारीवरून बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यांत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर, राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतात. राजकारण स्वार्थी झालेले आहे. राजकारण नासवले जात आहे. राणा कशा बोलतात. राणा कुणाच्या भरवशावर निवडून आल्या? शरद पवार या ज्येष्ठ नेत्याचा आशीर्वाद आणि काँग्रेसच्या मतांमुळे त्या निवडून आल्या होत्या. आता राणांची भूमिका बदलली. लोक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीत सुरू असलेल्या चर्चा, नाना पटोले अन् प्रकाश आंबेडकर यांच्या आरोप-प्रत्यारोपावर भाष्य करताना, साक्षगंध होण्यापूर्वीच आम्ही प्रकाश आंबेडकरांना पसंत केले होते. पण त्यांनी लग्नासाठी का नकार दिला. जे काही अपेक्षित होते, त्यासाठी चर्चा करायची होती. पण त्यांनी लग्न मोडले, असे वडेट्टीवार म्हणाले.