“केंद्र सरकारकडून अदानीचाच विकास, इलेक्टोरल बॉण्डवर नरेंद्र मोदी गप्प का?”; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 09:28 AM2024-04-09T09:28:18+5:302024-04-09T09:29:21+5:30

Congress Nana Patole News: काँग्रेसने न्यायपत्र जाहीरनामा प्रसिद्ध केल्यापासून भाजपा आणि पंतप्रधान मोदींची झोप उडाली आहे, असा दावा करण्यात आला आहे.

congress nana patole replied bjp govt and pm narendra modi after criticism in rally for lok sabha election 2024 | “केंद्र सरकारकडून अदानीचाच विकास, इलेक्टोरल बॉण्डवर नरेंद्र मोदी गप्प का?”; काँग्रेसची टीका

“केंद्र सरकारकडून अदानीचाच विकास, इलेक्टोरल बॉण्डवर नरेंद्र मोदी गप्प का?”; काँग्रेसची टीका

Congress Nana Patole News: काँग्रेस सरकारने दहशतवाद पोसला, असा आरोप करताना पंतप्रधान मोदी भाजपा सरकारच्या काळातील दहशतवाद सोयीस्करपणे विसरले. तीन दहशतवाद्यांना तत्कालीन वाजपेयी सरकारने सोडून दिले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या तीन अतिरेक्यांना कंधारला सोडण्यासाठी खुद्द वाजपेयी सरकारचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह गेले होते. भाजपा सरकारच्या काळातच संसदेवर अतिरेकी झाला होता, पठानकोट एयरबेसवरील हल्लाही भाजपा सरकारच्या काळात झाला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी पुलवामामध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले, त्याचा आजपर्यंत तपासही मोदी सरकार करु शकले नाहीत, असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या तोंडाने दहशतवादीवर बोलतात? या शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली. 

दलित, वंचित, आदिवासी व मागासवर्गीय कुटुंबासाठी सरकारने मोठे काम केल्याची वल्गना पंतप्रधान मोदींनी केली. परंतु देशातील ८० कोटी लोकांना मोफत रेशन देतो, यात कसला अभिमान व कसला विकास? ही तर अधोगती आहे. मोदी सरकारने ८० कोटी जनतेची ५ किलो धान्य देऊन १० वर्ष केवळ लुट आणि लुटच केली आहे. गरिबांना उज्ज्वला योजना देऊन त्यांचे रेशनवरील रॉकेल बंद केले व गॅस सिलिंडरही महाग केला. मुंबईतील मेट्रोसह विविध मोठ्या प्रकल्पांची पायाभरणीच काँग्रेस सरकारने केली याची माहितीही पंतप्रधानांना नाही. समृद्धी महामार्ग व जलयुक्त शिवार योजनांचा गवगवा करताना या दोन्ही प्रकल्पात भ्रष्टाचार बोकाळला होता यातून कोणी मलई खाल्ली हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे, या शब्दांत नाना पटोलेंनी हल्लाबोल केला.

काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचे सरकाराने केलेल्या भ्रष्टाचारापासून पळ काढू शकत नाही. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच मानाचे पान देणाऱ्या मोदींना भ्रष्टाचारावर बोलण्याचा काय अधिकार? कार्पोरेट कंपन्यांना ब्लॅकमेल करुन तसेच ठेकेदारांना मोठी कंत्राटे देण्याच्या बदल्यात इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची खंडणी वसुली केली, त्यावर नरेंद्र मोदी का बोलत नाहीत? काँग्रेसने एकाच परिवाराचा विकास केला हा आरोपही तद्दन चुकीचा असून नरेंद्र मोदी यांनीच मागील १० वर्षात केवळ अदानी परिवाराचाच विकास केला आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

दरम्यान, काँग्रेस पक्षाने सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा संकल्प हाती घेऊन ‘न्यायपत्र’ हा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यापासून भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झोप उडालेली दिसत आहे.काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम लिगची छाप असल्याचा पंतप्रधान मोदींचा आरोप हास्यास्पद असून इतिहासाचा अभ्यास नाही हे स्पष्ट दिसते. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात संपूर्ण देश रस्त्यावर उतरला होता तेव्हा जनसंघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी बंगाल, सिंध आणि वायव्य सरहद्द प्रांतात मुस्लिम लीगच्या सहकार्याने सरकार चालवत होते आणि चळवळ दडपण्याच्या सूचना देत होते. मुस्लीम लीगशी असलेल्या या जुन्या संबंधाचीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पुन्हा आठवण होत असावी, असा निशाणा नाना पटोले यांनी लगावला.
 

Web Title: congress nana patole replied bjp govt and pm narendra modi after criticism in rally for lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.