“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 16:25 IST2024-04-27T16:25:34+5:302024-04-27T16:25:40+5:30
Balasaheb Thorat News: विदर्भात महाविकास आघाडीचीच लाट असून, विजय निश्चित आहे, असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला.

“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
Balasaheb Thorat News: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश करत काँग्रेसला मोठा धक्का दिला. यानंतर लगेचच भाजपाने अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले. या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण भाजपाचे स्टार प्रचारक असून, बैठका, मेळावे घेताना पाहायला मिळत आहेत. अशोक चव्हाण यांच्या भाजपात जाण्याने नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या चर्चेला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.
बारामतीतील प्रचारसभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी शरद पवार गटावर टीका केली. धनंजय मुंडे यांनी शरद पवारांवर बोलावे हे योग्य नाही. शरद पवारांमुळेच ते मोठे झाले. अशाप्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे हा धनंजय मुंडे यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. कुणी असे काहीही बोलले तरी शरद पवार यांचे महत्त्व कमी होऊ शकत नाही. शरद पवार यांनी नेहमीच आपला पुरोगामी विचार जपण्याचा प्रयत्न केला आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
अशोक चव्हाणांच्या जाण्याने काँग्रेसची ताकद घटल्याचे दिसत नाही
अशोक चव्हाण यांच्याबद्दल प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, अशोक चव्हाण भाजपात का आणि कशासाठी गेले, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्यामुळे काँग्रेसची ताकद घटली किंवा त्यांची वाढली असे दिसत नाही. असे काही असते तर, पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि जेपी नड्डा यांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती. अशोक चव्हाण जर मोठे नेते असते, तर त्यांना भाजपाच्या नेत्यांच्या सभेची गरज भासली नसती, अशी खोचक टीका बाळासाहेब थोरात यांनी केली. तसेच विदर्भामध्ये महाविकास आघाडीचीच लाट आहे. जनता भाजपावर तसेच पंतप्रधान मोदींच्या विधानावर नाराज आहे. विदर्भात महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे, असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला.