‘लाव रे तो व्हिडिओ’! “सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलणारा”; CM शिंदेंची ठाकरे गटावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 16:46 IST2024-04-26T16:46:34+5:302024-04-26T16:46:48+5:30
CM Eknath Shinde News: उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना आणि काँग्रेसवर टीका करतानाचा एक जुना व्हिडिओ दाखत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला सुनावले.

‘लाव रे तो व्हिडिओ’! “सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलणारा”; CM शिंदेंची ठाकरे गटावर टीका
CM Eknath Shinde News: शिवसेना शिंदे गटासह महायुतीच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकामागून एक प्रचारसभा घेताना पाहायला मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीत काही जागांवर अद्याप महायुतीचे एकमत होताना दिसत नाही. असे असले तरी शिवसेना शिंदे गटाच्या जाहीर उमेदवारांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जोरदार खिंड लढवत आहेत. यातच लाव रे तो व्हिडिओ करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली.
शिवसेना शिंदे गटाचे छत्रपती संभाजीनगर येथील उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाश शिंदे बोलत होते. यंदाची निवडणूक देशाच्या विकासाची, प्रगतीची तसेच नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्याची आहे. बाळासाहेब ठाकरेंची घोषणा होती की, गर्व से कहो हम हिंदू है. अबकी बार ४०० पारमध्ये संदीपान भुमरे पहिले हवेत, असे सांगत जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलणारा
लाव रे तो व्हिडिओ म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी भरसभेत उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ दाखवला. त्या व्हिडिओत उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना दिसत असून, काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करताना पाहायला मिळत आहेत. जे उबाठा मोदींच गुणगान गात होते, ते मी तुम्हाला ऐकवतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले. व्हिडिओ दाखवल्यानंतर सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलणारा, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. बघितल का तुम्ही, नरेंद्र मोदींच्या नावाने खडे फोडणारे कोण, बाप एक नंबरी, बेटा १० नंबरी, या शब्दांत एकनाथ शिंदेंनी निशाणा साधला.
दरम्यान, आम्हाला काहीजण मिंधे म्हणतात, नीच म्हणतात, खालच्या भाषेत टीका करतात. सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला, हे सहन होत नाही. म्हणूनच मला शिवी देण्याचे प्रकार सुरु आहेत. हा माझा नव्हे तर शेतकरी, कष्टकरी, माता भगिनींचा अपमान आहे, असे एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला सुनावले.