देवेंद्र फडणवीस जेलमध्ये टाकणार होते; राऊतांच्या दाव्यावर CM शिंदेंचे सूचक प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 17:46 IST2024-04-26T17:45:10+5:302024-04-26T17:46:15+5:30
CM Eknath Shinde News: देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना जेलमध्ये टाकायच्या तयारीत होते, म्हणूनच एकनाथ शिंदे पळाले, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिले.

देवेंद्र फडणवीस जेलमध्ये टाकणार होते; राऊतांच्या दाव्यावर CM शिंदेंचे सूचक प्रत्युत्तर
CM Eknath Shinde News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे तीव्र होताना दिसत आहेत. यातच देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना जेलमध्ये टाकायच्या तयारीत होते, म्हणूनच एकनाथ शिंदे पळाले, असा मोठा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिला.
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, त्या पळपुटे लोकांना बोलायचा अधिकार काय, एकनाथ शिंदे जे करतो, ते खुलेपणाने करतो. जो निर्णय घेतो, तो धाडसाने घेतो. कोणतीही भीती नाही आणि कोणत्याही दबावाखाली निर्णय घेत नाही. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील निर्णय घेतला. शिवसेना वाचवण्यासाठी निर्णय घेतला. धनुष्यबाण वाचवण्यासाठी निर्णय घेतला. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही निर्णय घेतला. बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती देऊन खुर्ची पटकवण्यासाठी तुम्ही प्रतारणा केली. ये जनता सब जानती हैं, या शब्दांत एकनाथ शिंदे यांनी निशाणा साधला.
आम्ही सूडबुद्धीने कारवाई करत नाही
मविआ सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीसांसह अनेक नेत्यांना जेलमध्ये टाकणार होते, असा दावा तुम्ही केला होता. मात्र, अशा कटकारस्थान करणाऱ्यांवर दोन वर्षे अजून काही कारवाई का केली नाही, असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. यावर, आम्ही सूडबुद्धीने कारवाई करत नाही. कंगना राणावत, अर्णव गोस्वामी, राहुल जोशी, नारायण राणे अशा कितीतरी लोकांवर मविआ काळात सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली. काही लोकांना जेलमध्ये टाकून आपले सरकार वाचवायचे, असे होते. हे सगळे जगजाहीर आहे, त्यावर एकदा बोललो. आता पुन्हा बोलणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.