माहेरच्यांना पण सुखाने राहू देत; चाकणकरांचा पंकजा मुंडेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 16:12 IST2019-10-18T16:05:25+5:302019-10-18T16:12:00+5:30
विरोधीपक्ष नेतेपदी विराजमान असलेल्या धनंजय मुंडे यांनी मागील पाच वर्षांत केलेल्या कामामुळे मतदार संघावर त्यांची पकड निर्माण झाली आहे. तर पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये घेऊन विरोधकांचे आव्हानच संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला आहे.

माहेरच्यांना पण सुखाने राहू देत; चाकणकरांचा पंकजा मुंडेंना टोला
मुंबई - विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून राजकीय नेत्यांचे शाब्दिक हल्ले प्रतिहल्ले सुरू झाले आहेत. परळीत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्यातील लढत महाराष्ट्रातील सर्वात चुरशीची मानली जात आहे. रोज या भावा-बहिणींची एकमेकांवर टीका होत आहे. त्यात आता राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही उडी घेतली आहे.
चाकणकर यांनी फेसबुकवरून भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे. खणा-नारळाची ओटी भरून आता लेकीची सासरी पाठवणी करा. चार दिवस सणासुदीला माहेरपणाला येऊन गोडधोड खा, माहेरच्या लोकांना आशिर्वाद द्या आणि आता सुखाने सासरी नांदा, आणि माहेरच्यांना पण सुखाने राहु देत हिच या दिवाळीच्या तुम्हाला शुभेच्छा..! अशी टीका चाकणकर यांनी केली.
तसेच शक्य झालं तर सासरचं नाव लावा असा सल्ला चाकणकर यांनी पंकजा मुंडे यांना नाव न घेता दिला. लोकसभेला एका लेकीला मतदान केले आहे. विधानसभेचं मतदान लेकासाठी करा, असं आवाहनही चाकणकर यांनी केले. आता या टीकेला पंकजा काय उत्तर देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
परळीतूनधनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात चुरस आहे. 2014 मध्ये पंकजा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध सहज विजय मिळवला होता. परंतु, विरोधीपक्ष नेतेपदी विराजमान असलेल्या धनंजय मुंडे यांनी मागील पाच वर्षांत केलेल्या कामामुळे मतदार संघावर त्यांची पकड निर्माण झाली आहे. तर पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये घेऊन विरोधकांचे आव्हानच संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला आहे.