अद्याप सांगलीत उमेदवारांनी अर्ज भरला नाही, काँग्रेस-शिवसेनेत खूप काही होऊ शकते; जयंत पाटलांचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 19:40 IST2024-04-15T19:39:35+5:302024-04-15T19:40:11+5:30
Jayant Patil On Sangli Loksabha Candidate Issue: सांगलीत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चर्चा सुरू होत्या. त्या चर्चा सुरू असताना आम्ही येऊन बोलणे योग्य नव्हते. - जयंत पाटील

अद्याप सांगलीत उमेदवारांनी अर्ज भरला नाही, काँग्रेस-शिवसेनेत खूप काही होऊ शकते; जयंत पाटलांचे संकेत
सांगलीतकाँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी आज अपक्ष अर्ज भरला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सांगलीत परस्पर उमेदवार दिल्याने पाटील समर्थक नाराज झाले असून बंडखोरी करण्याची भुमिका काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली आहे. यावरून आता जयंत पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भुमिका स्पष्ट केली आहे.
सांगलीत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चर्चा सुरू होत्या. त्या चर्चा सुरू असताना आम्ही येऊन बोलणे योग्य नव्हते. सांगलीची जागा काँग्रेस आणि शिवसेनेने मागितली होती. शरद पवारांपासून आम्ही सर्वांनी काँग्रेसला जागा मिळावी, तोडगा निघावा यासाठी प्रयत्न केले. पेटवणारे पेटवत असतात काहींचा यामागे हेतू वेगळा असतो. पेटवणारे एकदा एकत्र आले आणि त्यांच्यामध्ये आले की अवघड होते. मी विशाल पाटील यांच्या संपर्कात आहे, असे शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
सांगलीचा तिढा सुटला पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी हा विषय बसून संपवावा. ज्यावेळी हा वाद सुरू होता त्यावेळी शरद पवार आणि मी स्वतः वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. अजून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज भरला नाही. त्यांच्यात खूप काही होऊ शकते. अर्ज मागे घेण्यापर्यंत वेळ आहे, असे संकेत पाटलांनी दिले.
माझ्या बद्दल बऱ्याचवेळा काही लोकांनी अपप्रचार केला. महाविकास आघाडीत आम्ही एकत्र बसलो. जागा वाटपात अनेक मतमतांतरे झाली. मलाच काही गोष्टींसाठी जबाबदार धरणे योग्य नाही. मग त्या पक्षाच्या नेत्यांना सुद्धा जबाबदार धरले पाहिजे. माझा त्याच्याशी काय संबंध? जुन्या वादाला काही लोक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकारण करताना पुढला विचार करायचा असतो. राज्य स्तरावर जो निर्णय झाला तो मान्य करून पुढे जायचे असते. या संबंधात जे लोक वावड्या उठवतात त्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे की त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते काय करतात, असे पाटील म्हणाले.
तसेच राजारामबापू पाटील आणि वसंतदादा पाटील हे वरती एकत्रित बसून चहा घेत असतील आणि म्हणत असतील हे काय चालले आहे. आपण एकमेकांना सांभाळून राजकारण केले. समजूतदार राजकारणी होते दोघे. मागे ४० वर्षांपूर्वी काय झाले याच्याशी काही घेणे देणे नाही. इतिहासावर बोलून भविष्याकडे लक्ष जात नाही, असा सल्लाही पाटलांनी दिला.