माढा मतदारसंघात भाजपाची कोंडी; पक्ष उमेदवार बदलणार की बंडखोरीला सामोरे जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 12:17 PM2024-03-18T12:17:53+5:302024-03-18T12:18:35+5:30

आता माघार घेऊ नका, जर माघार घेतली तर चुकीचा संदेश जाईल असं कार्यकर्ते आग्रह धरत होते.

BJP has a headache due to the clash between Mohite Patil and Nimbalkar in Madha constituency | माढा मतदारसंघात भाजपाची कोंडी; पक्ष उमेदवार बदलणार की बंडखोरीला सामोरे जाणार?

माढा मतदारसंघात भाजपाची कोंडी; पक्ष उमेदवार बदलणार की बंडखोरीला सामोरे जाणार?

माढा - सोलापूरच्या माढा मतदारसंघात भाजपाने पुन्हा एकदा रणजितसिंह निंबाळकर यांना तिकीट दिल्यानं मोहिते पाटील समर्थक मोठ्या संख्येने नाराज झालेत. रविवारी मोहिते पाटील समर्थकांची बैठक पार पडली. या बैठकीला रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह शेकापचे जयंत पाटील हेदेखील उपस्थित होते. माढा मतदारसंघातील उमेदवारी भाजपासाठी डोकेदुखी बनली आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी आलेले मंत्री गिरीश महाजन हेदेखील हतबल झाल्याचं पाहायला मिळालं. मी शब्द देणार नाही, अन्यथा मी अडचणीत येईन असं विधान महाजनांनी केले. 

गिरीश महाजन म्हणाले की, उमेदवाराच्या नावावर कोणत्याही मतदारसंघात एकमत होत नसते. प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची मोठी संख्या असते. मात्र माढ्यातील नाराजी मोठी आहे. विजयदादांचे पक्षात मोठे वजन आहे. त्यांना भेटण्यासाठी आलो. चर्चा सकारात्मक झाली. मला आता कोणताही शब्द देता येत नाही. नाहीतर मी अडचणीत येईन, मात्र पक्षश्रेष्ठी निश्चितच दखल घेतील असं त्यांनी सांगितले. 

अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर मोहिते पाटील समर्थकांची बैठक झाली. याठिकाणी सकाळपासूनच गर्दी होती. आता माघार घेऊ नका, जर माघार घेतली तर चुकीचा संदेश जाईल असं कार्यकर्ते आग्रह धरत होते. तर येत्या १-२ दिवसांत यावर निर्णय घेऊ असं सांगण्यात आले. तर सध्या जे काही चालू आहे. त्याबद्दल नो कॉमेंट्स, रामराजे निंबाळकर याबद्दल बोलतील वेट अँन्ड वॉच असं भाजपा जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटलं. 

दरम्यान, माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील यांच्यावर प्रेम करणारी लोक आहेत. ते निश्चितपणे पक्षाचे काम प्रामाणिक करतील. मात्र जे राजकीय शत्रू आहेत ते विरोधात काम करून मोहिते पाटील यांना बदनाम करण्याचं काम करतायेत. भविष्यात माझ्या प्रचाराची रणनीती आखण्यासाठी अकलूजमध्ये बैठक झाली असावी असं खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटलं. माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांचेही वर्चस्व आहे. यंदा रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी न देता मोहिते पाटील घरातील एकाला संधी मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती. परंतु पक्षाने पुन्हा एकदा निंबाळकरांना संधी देताच मोहिते पाटील घराणे नाराज झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्ष माढा लोकसभेसाठी उमेदवार बदलणार की बंडखोरीला सामोरे जाणार हे पाहणे गरजेचे आहे. 

Web Title: BJP has a headache due to the clash between Mohite Patil and Nimbalkar in Madha constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.