"झोपडपट्टयांना २५०० रूपये अन्..."; बारामतीत २०० कोटी वाटल्याचा रोहित पवारांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 16:12 IST2024-05-07T16:07:47+5:302024-05-07T16:12:19+5:30
Rohit Pawar on Ajit Pawar : आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत

"झोपडपट्टयांना २५०० रूपये अन्..."; बारामतीत २०० कोटी वाटल्याचा रोहित पवारांचा आरोप
Baramati Loksabha Election : बारामतीच्या लोकसभा निवडणुकीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशा अटीतटीच्या लढतीसाठी पवार कुटुंबिय मैदानात उतरलं आहे. निवडणुकीच्या सुरुवातीपासून अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरुच होते. अशातच आता बारामतीमध्ये मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटले गेल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. यासोबत अजित पवार यांच्या ताब्यात असलेली बँक मध्यरात्री देखील सुरु असल्याचे रोहित पवार म्हणाले. तसेच यासाठी जवळपास २०० कोटी रुपये खर्च केल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं.
रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बारामती मतदारसंघात चक्क पोलीस ‘बंदोबस्तात’ पैशांचा पाऊस पडतोय अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली होती. त्यानंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत झोपडपट्टयांना २५०० रूपये आणि ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांना ५ हजार रूपये वाटल्याचा आरोप केला. तसेच पैसै वाटण्याचा हा आकडा २०० कोटीच्या आसपास असल्याचा खुलासा देखील रोहित पवारांनी केला.
"दादा बरोबर म्हणाले माझं डोकं फिरलंय. २०० ते ३०० कोटी एवढा मोठा आकडा तो पण एका निवडणुकीसाठी. एवढा मोठा आकडा जर आमदारकीसाठी दादांनी वापरला असता तर १४४ च्या पुढे आम्ही गेलो असतो. एकहाती सत्ता आली असती आणि अजित दादा मुख्यमंत्री झाले असते. तुम्ही बहिणीला पाडण्यासाठी अशा गोष्टीचा वापर करता. दुदैव आहे की बहिणीला पाडण्यासाठी सहा महिन्यापूर्वी दादा संपूर्ण यंत्रणा घेऊन गेले. त्यावेळेस आम्हाला वाटलं की तिसऱ्या कोणाला संधी दिली जाईल. पण त्यांनी घरातलाच उमेदवार उतरवला. त्यामुळे बहिणीने तुमच्यावर जो विश्वास ठेवला त्याचा तुम्ही विश्वासाघत केला," असेही रोहित पवार म्हणाले.
दरम्यान, रोहित पवार यांच्या आरोपांवर अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. "हे काम निवडणूक आयोगाचे आहे. आजपर्यंत एक लोकसभा आणि सात विधानसभा निवडणुका मी लढवल्या आहेत. मी असले प्रकार कधी करत नाही. पहिल्यापासून विरोधकांतील काही बगलबच्चे अशाच प्रकारचे आरोप करत होते, पण मी त्याला फार महत्त्व देत नाही," असं अजित पवार म्हणाले.