सुप्रिया सुळेंचं स्टेटस ठेवल्याने दूध संघातील ड्रायव्हरची बदली?; संताप व्यक्त करत आव्हाड म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 02:05 PM2024-04-01T14:05:57+5:302024-04-01T14:06:44+5:30

तरुणाच्या आरोपानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेत अजित पवार गटावर निशाणा साधला आहे.

baramati lok sabha ncp sp mla jitendra awhad criticizes ajit pawar faction over transfer of worker | सुप्रिया सुळेंचं स्टेटस ठेवल्याने दूध संघातील ड्रायव्हरची बदली?; संताप व्यक्त करत आव्हाड म्हणाले...

सुप्रिया सुळेंचं स्टेटस ठेवल्याने दूध संघातील ड्रायव्हरची बदली?; संताप व्यक्त करत आव्हाड म्हणाले...

Baramati Lok Sabha ( Marathi News ) : बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा पवार विरुद्ध पवार अशी चुरशीची लढत होणार आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे तर महायुतीकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक रिंगणात आहेत. या चुरशीच्या सामन्यात एक-एक मत आपल्याकडे खेचण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाणार आहे. मात्र या प्रयत्नात विरोधी बाजूच्या मतदारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आरोप होऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनीच बारामतीत दबावाचं राजकारण होत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता जिल्हा दूध संघात ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने आपण सुप्रिया सुळे यांच्या समर्थनार्थ व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवतो त्यामुळे माझी सुरक्षारक्षक म्हणून बदली करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तरुणाच्या या आरोपानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही नाव न घेत अजित पवार गटावर निशाणा साधला आहे.

"सुप्रिया ताईंचे स्टेट्स ठेवतो म्हणून पुणे जिल्हा दूध संघातील ड्रायव्हरची बदली केली, किती छोट्या मनाची माणसे आहेत," अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

काय आहे तरुणाचा आरोप?

ज्ञानेश्वर आखाडे असं आरोप करणाऱ्या तरुणाचं नाव असून त्याने एक्सवर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, "आज दिनांक १/४/२०२४ रोजी माझी ड्रायव्हर ही ग्रेड असताना माझी सुरक्षारक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. काहीच हरकत नाही, परंतु राजकारण आज माझ्या कामात यांनी आणले. माझी चूक काय तर मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे काम करत आहे म्हणून एवढे गलिच्छ राजकारण सध्याच्या घडीला सुरू आहे. सुप्रियाताई...मी पुणे जिल्हा सहकारी दूध संघामध्ये काम करत आहे. माझी चूक काय तर म्हणे मी आपल्या संघटनेचे काम करू नये .म्हणजे एवढं सुद्धा आजच्या घडीला संघातील कर्मचाऱ्याला स्वातंत्र्य नाही. प्रत्येक कर्मचारी हा आज दबावाखाली काम करत आहे, एखाद्यानं साधं फोनमध्ये स्टेटस ठेवलं तरी त्याला बोलायचं की स्टेटस डिलिट कर नाहीतर तुझी बदली करण्यात येईल. आज माझ्यावर कारवाई झाली, या कारवाईच्या भीतीने कोणीही कर्मचारी एक स्टेटस ठेवू शकत नाही, आज घडीला संघातील सर्व कर्मचारी यांच्याविरोधात आहेत, परंतु बोलू शकत नाहीत," असा आरोप ज्ञानेश्वर आखाडे या तरुणाने केला आहे.

दरम्यान, या आरोपावर जिल्हा दूध संघाकडून काय स्पष्टीकरण दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: baramati lok sabha ncp sp mla jitendra awhad criticizes ajit pawar faction over transfer of worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.