"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 18:15 IST2026-01-15T18:14:21+5:302026-01-15T18:15:45+5:30
Mumbai Municipal Election 2026: महापालिकांच्या निवडणुकीचे मतदान होत असताना अनेक ठिकाणी गोंधळ झाला. मतदारांची नावेच मतदार नसल्याचे, शाई पुसली जात असल्याचे, तसेच अनेक ठिकाणी मतदान ईव्हीएम बंद पडल्याचे प्रकार घडले. त्यावरून विरोधकांनी आयोगाला घेरले, तर भाजपाकडून विरोधकांना लक्ष्य करण्यात आले.

"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
महापालिकांच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान अनेक ठिकाणी गोंधळ उडाल्याचे चित्र दिसले. त्यावरून विरोधकांनी निवडणूक आयोगाला घेरले. विरोधकांकडून निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. विरोधकांकडून टीका करण्यात आल्यानंतर भाजपाचे नेते आणि मंत्री आशिष शेलारांनी विरोधक रडत असल्याची टीका केली. विरोधकांचे सल्लागार सडके आणि विरोधक रडके अशी खिल्ली त्यांनी उडवली. त्यानंतर काँग्रेसने शेलारांवर प्रश्नांची सरबत्ती करत निशाणा साधला.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आशिष शेलार यांना निवडणूक आयोग, मतदान प्रक्रिया आणि निवडणूक प्रक्रियेवरून अनेक प्रश्न विचारले.
अतुल लोंढे म्हणाले, "आशिष शेलारजी, चोराला चोर म्हटले तर तुम्हाला मिर्ची का लागली? आम्ही तर निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहोत. शाई कशी मिटते आहे? शाई मिटली नाही पाहिजे. पूर्वी शाई लावल्यावर मांस निघायचं पण शाही मिटत नव्हती. तुम्ही आता मार्कर पेनने लावता. आणि आता तुम्ही लावता म्हटल्यावर आक्षेप घेऊ नका. कारण निवडणूक आयोग आणि तुम्ही काही वेगळे नाही आहात."
माझ्या घरातील सहा जणांची नावे पाच केंद्रावर कशी?
"शाई मिटली नाही पाहिजे, ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे; मतदारांची नाही. भाजपा का प्रत्येक वेळी निवडणूक आयोगाच्या बचावासाठी येते? हाही एक प्रश्न आहे. बोगस मतदान कोण करून घेतं? लोकांचे मतदान वेगवेगळ्या ठिकाणी का गेले? एकाच घरातील मतदान सहा वेगवेगळ्या ठिकाणी कसे गेले? माझ्या घरातील सहा जणांचे मतदान पाच केंद्रांवर, वेगवेगळ्या प्रभागांमध्ये गेले. का बरे गेले? आजपर्यंत तर नव्हते गेले", असे सवाल लोंढे यांनी शेलार यांना केले आहेत.
ऑनलाईन यादीत नाव, मग बूथ यादीत का नाही?
"प्रभागातील निवडणूक पहिल्यांदा होत आहे का? २०१७ मध्ये झाली. २०१२ मध्ये झाली. दोनचा प्रभाग होता. तेव्हा तर असे झाले नाही. त्यामुळे बोगस मतदान कोण करतं? दलित वस्तीतील मतदान कसे इकडच्या तिकडे जाते. मतदान कसे बाद होते. ऑनलाईन मतदार यादीमध्ये दिसते, पण बूथ यादीमध्ये दिसत नाही. ऑनलाईन यादी वेगळी, बूथवरील यादी वेगळी का?", असा सवाल लोंढेंनी शेलार यांना केला आहे.
"तुमचे पालकमंत्री आणि केंद्रीय मंत्री आजही रस्त्यांवर पायी फिरत आहेत? कालही कसे फिरून बैठका घेत होते? तुम्ही काम केले आहे ना? या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा नासवडा करणारे तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता? आम्हाला म्हणता रडकुडीला आले. रडकुडी तुम्ही आला आहात, म्हणून तुम्ही चोऱ्या माऱ्या करत आहात", अशी टीका काँग्रेसचे अतुल लोंढे यांनी केली.