सुनेत्रा हरल्या तर अजित पवारांचे राजकीय अस्तित्व धोक्यात? काय म्हणतायत उपमुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 14:26 IST2024-04-22T14:19:50+5:302024-04-22T14:26:00+5:30
Sunetra Ajit Pawar Baramati News: सुनेत्रा पवारांचा पराभव झाला तर अजित पवारांचे राजकीय अस्तित्व संपेल, अशी चर्चा सुरु आहे. २०१९ मध्ये पार्थ पवार यांचा पराभव झाला होता. परंतु त्याने अजित पवारांना काही फरक पडला नव्हता. कारण तेव्हाची परिस्थिती वेगळ होती.

सुनेत्रा हरल्या तर अजित पवारांचे राजकीय अस्तित्व धोक्यात? काय म्हणतायत उपमुख्यमंत्री
अजित पवारांना पराभव नवा नाहीय. लोकसभेला हिकडं, विधानसभेला तिकडं, हे खुद्द अजित दादांनीच म्हटलेले आहे. म्हणजेच लोकसभेला शरद पवारांची मुलगी सुप्रिया सुळे यांना मतदान करण्याचा बारामतीकरांचा कल आहे. म्हणजे सुनेत्रा पवारांना मत देणार नाही, असा याचा अर्थ झाला. तरीही अजित पवारांनी अस्तित्वाची लढाई म्हणून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देत आपले राजकीय करिअर पणाला लावले आहे.
सुनेत्रा पवारांचा पराभव झाला तर अजित पवारांचे राजकीय अस्तित्व संपेल, अशी चर्चा सुरु आहे. २०१९ मध्ये पार्थ पवार यांचा पराभव झाला होता. परंतु त्याने अजित पवारांना काही फरक पडला नव्हता. कारण तेव्हाची परिस्थिती वेगळ होती. त्यावेळी अजित पवार हे शरद पवारांच्या छत्रछायेखाली होते. आता पवार वि. पवार असा संघर्ष सुरु आहे. राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांनी हिसकावून घेतला आहे. बंडानंतरची ही निवडणूक असल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवार जोरदार आक्रमक झालेले आहेत. काहीही करून बारामतीची जागा त्यांना निवडून आणायची आहे. कठीण आहे, हे भाजपनेही मान्य केले आहे. तरीही जोरबैठका सुरु आहेत. ही जागा पडली तर अजित पवारांना मोठा धक्का बसणार हे नक्की आहे. परंतु यावर अजित पवारांचे काय म्हणणे आहे, ते त्यांनी एबीपी माझावरील इंटर्व्ह्यूमध्ये मांडले आहे.
जो पर्यंत सामान्य माणूस, मतदार माझ्या पाठीशी उभा आहे तोपर्यंत कोणत्याही व्यक्तीची राजकीय कारकीर्द धोक्यात येऊ शकत नाही, असे मत अजित पवारांनी मांडले आहे. मी काम करणारा माणूस आहे हे लोकांना माहिती आहे. जी गोष्ट हाती घेतो ती तडीस नेतो. आजवर कोणाचे नुकसान केलेले नाही. यामुळे जनता जोवर सोबत आहे तोवर कारकीर्दीला धोका नाही, असे पवार म्हणाले.
सुनेत्रा पवारांना उमेदवारी का दिली, यावर अजित पवारांनी भाष्य केले आहे. बारामतीसाठी अनेक नावे चर्चेत आली होती. त्यात सुनेत्रा पवारांचे समाजकार्य, काम आणि अनुभव उजवे ठरले. तसेच गावकऱ्यांसोबत चांगले ट्युनिंग होते. बारामतीचा विकास करायचा असेल तर केंद्र आणि राज्य सरकार एकत्र असेल तर वेगाने करता येईल, असे मत अजित पवारांनी मांडले.