बारामतीत अजित पवारांची कोंडी; राष्ट्रवादीचा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 14:08 IST2024-03-13T14:07:23+5:302024-03-13T14:08:49+5:30
जाणीवपूर्वक वरिष्ठांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करणार असाल तर ते सहन करणार नाही असं आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

बारामतीत अजित पवारांची कोंडी; राष्ट्रवादीचा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा
बारामती - बारामतीत अडचण निर्माण करणार असतील तर साहजिकच कल्याणमध्येही अडचण निर्माण होऊ शकते. श्रीकांत शिंदे तिथे उमेदवार आहे. सर्वांनी एकमेकांना सन्मान ठेवावा हे महायुतीत ठरले असताना आम्ही त्याचे पालन करतोय. याचा अर्थ विजय शिवतारेंनी वाचाळवीरासारखं बोलावे हे आम्ही सहन करून घेणार नाही. कल्याणबाबत जे आनंद परांजपे म्हणाले हा त्यांचा एकट्याचा इशारा नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इशारा आहे असं आमदार अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.
विजय शिवतारे बारामतीत अपक्ष निवडणूक लढणार असल्याची घोषणा केल्यानंतर अमोल मिटकरींनी म्हटलं की, विजय शिवतारे यांनी लोकसभा लढवावी का नाही, हा त्यांच्या कार्यकर्त्यांचा आणि त्यांचा लोकशाहीतील अधिकार आहे. मात्र महायुतीत राहून आमच्याच वरिष्ठ नेत्यांबद्दल अपशब्द वापरण्याला आमचा तीव्र विरोध आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंना समज दिल्याचं कळतं. जर यानंतर अजित पवारांवर बोलून, चुकीचं विधान करून मी बारामतीत खासदार होऊ शकतो असं शिवतारेंना वाटत असेल तर बारामतीच्या जनतेला कामे कुणी केली हे माहिती आहे. विजय शिवतारेंना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. मात्र याचा तिळमात्र फरक बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारावर पडणार नाही याची शाश्वती आहे. शिवतारेंना जनता त्यांची जागा दाखवून देईल असं त्यांनी सांगितले.
तसेच आनंद परांजपे कल्याणचे माजी खासदार आहेत. अजित पवारांवर प्रत्येकाची निष्ठा असते. म्हणून त्यांनी कल्याणबाबत विधान केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरोधात जर विजय शिवतारे महायुतीचे घटक पक्ष असताना बोलत असतील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना समज देत नसतील. जाणीवपूर्वक वरिष्ठांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करणार असाल तर ते सहन करणार नाही. पक्षातून त्यांची हकालपट्टी होईल असा संदेशही मुख्यंत्र्यांनी शिवतारेंना दिल्याचे कळते. त्यामुळे नाईलाजास्तव ते अपक्ष लढतायेत. शिवतारेंचे डिपॉझिट जप्त होईल हे नक्की असा विश्वास आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केला.
विजय शिवतारेंचा अजित पवारांवर निशाणा
अजित पवारांनी २०१९ च्या निवडणुकीत खालची पातळी गाठली. मी लिलावती रुग्णालयात दाखल होतो. लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी खोटं नाटकं करतोय, तू कसा निवडून येतो हे बघतोच असं अजित पवार म्हणाले होते. राजकारणात उर्मट भाषा त्यांनी केली होती. मी त्यांना माफ केले, महायुतीत आल्यावर स्वागत केले. परंतु उर्मट भाषा गेली नाही असा आरोप विजय शिवतारेंनी अजित पवारांवर केला. तसेच बारामतीत पवार कुटुंबाविरोधात मतदान होते. साडेपाच लाख मतदार हे पवारविरोधक आहेत. त्यांना ना सुप्रिया सुळेंना मत द्यायचंय ना सुनेत्रा पवारांना, मग त्या मतदारांसाठी मी उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे. पुरंदरची लोक बोलतायेत आम्हाला बदला घ्यायचाय. मी बोलत नाही. तो बदला नियतीने घेतला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात लोकशाहीला मानणाऱ्या लोकांसाठी मी ही निवडणूक लढणार म्हणजे लढणार असं विजय शिवतारे यांनी यांनी स्पष्ट केले.