Crime: सेक्ससाठी नकार देणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळं फुटलं पतीचं पितळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 19:43 IST2026-01-12T19:31:47+5:302026-01-12T19:43:59+5:30
Indore Murder Case: नात्यातील दुरावा आणि रागाचा अंत किती भयानक असू शकतो, याचे एक क्रूर उदाहरण मध्य प्रदेशातील इंदूरमधून समोर आले. एका पतीने आपल्या पत्नीची केवळ यासाठी हत्या केली कारण तिने गेल्या ८ वर्षांपासून त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता.

Crime: सेक्ससाठी नकार देणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळं फुटलं पतीचं पितळ!
मध्य प्रदेशातील इंदूर शहरात पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी एक खळबळजनक घटना समोर आली. गेल्या आठ वर्षांपासून पत्नी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत असल्याच्या रागातून पतीने तिची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे.
ही घटना ९ जानेवारी रोजी एरोड्रोम पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ४० वर्षीय पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी पतीने तिचा मृतदेह शासकीय महाराजा यशवंतराव रुग्णालयात नेला. तिथे त्याने डॉक्टरांना सांगितले की, पत्नीचा रक्तदाब अचानक वाढल्याने ती घरात चक्कर येऊन पडली आणि डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाला. मात्र, महिलेच्या शरीरावरील खुणा पाहून डॉक्टरांना संशय आला.
पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण लालचंदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या मृत्यूचे संशयास्पद स्वरूप पाहून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाब समोर आली, महिलेचा मृत्यू डोक्याला लागलेल्या मारामुळे नाही, तर गळा दाबल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले.
शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी पतीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीने अखेर आपला गुन्हा कबूल केला. आरोपी हा व्यवसायाने मेकॅनिक आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, "गेल्या आठ वर्षांपासून पत्नी त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत होती. यावरून त्यांच्यात वारंवार वाद होत होते. याच रागातून ९ जानेवारीला त्याने तिची गळा दाबून हत्या केली."