लातूरचा मोठा निकाल! पहिल्या महापौर स्मिता खानापुरे पराभूत, भाजपच्या प्रेरणा होनराव विजयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 13:45 IST2026-01-16T13:44:43+5:302026-01-16T13:45:46+5:30
काँग्रेसच्या पहिल्या महापौर प्रा. स्मिता खानापुरे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला

लातूरचा मोठा निकाल! पहिल्या महापौर स्मिता खानापुरे पराभूत, भाजपच्या प्रेरणा होनराव विजयी
लातूर: लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आज माजी महापौरांच्या प्रतिष्ठेचा फैसला झाला आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून झालेल्या पाच महापौरांपैकी चार जण यावेळेस रिंगणात होते. मात्र, मतदारांनी अनुभवापेक्षा रणनीती आणि नवीन समीकरणांना पसंती दिल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या पहिल्या महापौर प्रा. स्मिता खानापुरे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला असून, भाजपच्या प्रवक्त्या प्रेरणा होनराव यांनी त्यांना धूळ चारली आहे.
माजी महापौरांचे नशीब काय सांगते? लातूरच्या राजकारणात 'पॉवरफुल' मानले जाणारे चारही माजी महापौर मूळचे काँग्रेसचेच. मात्र, या निवडणुकीत सर्वांच्या वाटा वेगळ्या होत्या.
विक्रांत गोजमगुंडे (विजयी): निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सोडून राष्ट्रवादी (अजित पवार) गटात प्रवेश केलेल्या गोजमगुंडे यांनी प्रभाग ५ मधून ४,७२९ मते मिळवत विजय मिळवला. त्यांच्या पक्षांतराच्या निर्णयावर मतदारांनी विजयाची मोहोर उमटवली आहे.
ॲड. दीपक सूळ (विजयी): काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या माजी महापौर दीपक सूळ यांनी प्रभाग १० मधून ५,४५१ मते घेत आपला दबदबा कायम राखला आहे.
प्रा. स्मिता खानापुरे (पराभूत): प्रभाग १५ मध्ये काँग्रेसकडून लढणाऱ्या स्मिता खानापुरे यांना भाजपच्या प्रेरणा होनराव (४,२४५ मते) यांनी पराभूत केले. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
सुरेश पवार: प्रभाग ६ मधून शिंदेसेनेकडून नशीब आजमावत असलेल्या माजी महापौर सुरेश पवार यांच्या निकालाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.
पक्षांतराची चुरस अन् काँग्रेसचे पारडे जड
या निवडणुकीत माजी महापौर सुरेश पवार यांनी भाजप आणि राष्ट्रवादीनंतर आता शिंदेसेना गाठली होती, तर गोजमगुंडे यांनी 'हात' सोडून 'घड्याळ' बांधले होते. या राजकीय कोलांटउड्यांमध्ये गोजमगुंडे यशस्वी ठरले आहेत. शहरात एकूण १८ प्रभाग असून, ७० जागांसाठी लढत होत आहे. या निवडणुकीत एकूण ३५९ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालानुसार काँग्रेस आणि वंचित आघाडीची युती ३३ जागांसह आघाडीवर आहे, तर भाजप १७ जागांवर तर राष्ट्रवादी ( अप) पक्ष एका जागेवर विजयी झाली आहे.