Kolhapur Municipal Election 2026: भाजप, शिंदेसेनेचे तीन प्रभागांतून चिन्ह गायब; काँग्रेस १५ प्रभागांत एकहाती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 19:05 IST2026-01-03T19:05:01+5:302026-01-03T19:05:53+5:30
एकच चिन्ह देण्यासाठी तडजोड

Kolhapur Municipal Election 2026: भाजप, शिंदेसेनेचे तीन प्रभागांतून चिन्ह गायब; काँग्रेस १५ प्रभागांत एकहाती
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रत्येक प्रभागात आपला उमेदवार असावा यासाठी महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये बरीच ताणाताणी झाली. मात्र, त्यानंतरही भाजप आणि शिंदेसेनेचे प्रत्येकी तीन प्रभागांतून चिन्ह गायब झाले आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक ७४ जागा लढविणाऱ्या काँग्रेसचे १५ प्रभागांमध्ये चारही जागांवर हाताच्या चिन्हावर उमेदवार आहेत.
भाजपला प्रभाग क्रमांक १, २ व १७ या प्रभागांमध्ये एकही उमेदवार देता आला नाही. प्रभाग १ व २ मध्ये चारही उमेदवार शिंदेसेनेचे आहेत, तर प्रभाग क्रमांक १७ मध्ये चारही उमेदवार राष्ट्रवादीचे आहेत. प्रभाग क्रमांक ३ व १६ मध्ये सगळेच उमेदवार कमळाच्या चिन्हावर लढत असल्याने येथे शिंदेसेना व राष्ट्रवादीचा एकही उमेदवार रिंगणात नाही, तर प्रभाग १७ मधील चारही उमेदवारांकडे घड्याळ असल्याने येथे ना कमळ फुलणार आहे ना धनुष्यबाण ताणले जाणार आहे.
वाचा : लोकांनी यांचे ऐकलं असते तर पावणेतीन लाखांनी कार्यक्रम झाला नसता, सतेज पाटील यांचा धनंजय महाडिकांना टोला
महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रत्येक प्रभागात आपले चिन्ह पोहोचावे यासाठी सारेच पक्ष धडपडत असतात. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत ८१ जागांसाठी २० प्रभागांमध्ये धुरळा उडाला असला तरी भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी या महायुतीमधील पक्षांना सर्वच प्रभागांत आपले उमेदवार देता आलेले नाहीत. युतीच्या जागावाटपात काही प्रभागांतील सर्वच जागा मित्र पक्षांना द्याव्या लागल्याने ही अडचण निर्माण झाली आहे.
कोणत्या प्रभागांमध्ये काँग्रेसचे चारही उमेदवार
महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढताना काँग्रेस ७४ जागांवर लढत आहे. एक उमेदवार काँग्रेसने पुरस्कृत केला आहे, तर उद्धवसेनेला सहा जागा दिल्या आहेत. प्रभाग क्रमांक १, ५, ९, २, ३, ४, ६, ८, १२, १३, १६, १७, १८, १९ व २० अशा १५ प्रभागांमधील चारही जागांवर काँग्रेसचे उमेदवार आहेत, तर प्रभाग क्रमांक ७, १०, ११, १४ व १५ येथील काही जागांवर उद्धवसेना व काही जागांवर काँग्रेस लढत आहे.
वाचा : अर्ज माघारीत घोळ झाला, कोल्हापुरात 'या' प्रभागात महायुतीचा अधिकृत उमेदवारच नाही राहिला
८ प्रभागांत एकहाती
आठ प्रभागांमध्ये महायुतीचे एकत्रित उमेदवार प्रभाग क्रमांक २० मध्ये भाजप तीन जागांवर तर शिंदेसेना एका जागेवर लढत आहे. तर प्रभाग क्रमांक ४, ५, ७, ९ मध्ये भाजप व शिंदेसेना प्रत्येकी दोन जागा लढवत आहे. प्रभाग क्रमांक ६, ८, १०, ११, १३, १४, १५, १८ या आठ प्रभागांमध्ये भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादीला आपला एक तरी उमेदवार उभे करण्याची संधी मिळाली आहे.
एकच चिन्ह देण्यासाठी तडजोड
काही प्रभागांमध्ये एकच चिन्ह असावे हा दृष्टिकोन ठेवून भाजप-शिंदेसेनेने त्यांचे उमेदवार एकमेकांच्या चिन्हावर उभे केले आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक १ मध्ये अमर साठे हे भाजपचे पदाधिकारी आहेत. मात्र, त्यांना शिंदेसेनेच्या धनुष्यबाणावर उभे केले आहे. असेच प्रकार काही प्रभागांमध्येही केल्याने भाजप, शिंदेसेनेला सर्व प्रभागांमध्ये कमळ व धनुष्यबाण देता आलेले नाही.
फटका कधी..?
निकालानंतर महापौरपदासाठी चुरस झाल्यास एकमेकांच्या चिन्हांवर लढवलेल्या उमेदवारांचा भाजप-शिंदेसेनेला फटका बसू शकतो. कोल्हापूरचा पहिला महापौर करण्यासाठी या दोन्ही पक्षात चुरस लागली आहे. जागा वाटपात त्याचे प्रतिबिंब उमटले आहे. त्यामुळे पदाधिकारी निवडताना एकेक जागा महत्त्वाची असते. शिवाय त्या त्या भागात पक्ष आणि चिन्ह रुजवण्यासाठी केलेले काम सगळे वाया जाते.