Kolhapur Municipal Election 2026: महायुतीचे दक्षिणेत मिटलंय, उत्तरेत पेटलंय; नेत्यांची आज पुन्हा बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 11:57 IST2025-12-26T11:52:23+5:302025-12-26T11:57:36+5:30
मुश्रीफ यांचाही कमी जागा घेण्यास नकार, क्षीरसागर यांच्या ‘इनकमिंग’ मोहिमेमुळे अडचणी

Kolhapur Municipal Election 2026: महायुतीचे दक्षिणेत मिटलंय, उत्तरेत पेटलंय; नेत्यांची आज पुन्हा बैठक
कोल्हापूर : महायुतीच्या जागा वाटपाचे चर्चेचे गुऱ्हाळ अजूनही सुरू असून, त्यातही ‘दक्षिण’ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचा विषय संपत आला असून, ‘उत्तर’मध्ये मात्र विषय अजूनही धगधगताच आहे. अशातच हसन मुश्रीफ यांनीही १५ पेक्षा कमी जागा घेण्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांच्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, भाजपची मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जागा वाटपाबाबत चर्चा झाली.
भाजपची पुण्यातील शुक्रवारची बैठक आटोपून मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक हे मुंबईला रवाना झाले होते. मुंबईतील चव्हाण यांच्या बैठकीला या तिघांसह संघटनमंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश सचिव महेश जाधव आणि महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांची उपस्थिती होती. सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत झालेल्या या बैठकीत भाजपने त्यांच्यापुरता विषय अंतिम करून घेतला आहे. त्यामुळे ही सर्व मंडळी पुन्हा कोल्हापूरला परत आली आहेत. अमल महाडिक यांच्या दक्षिण मतदारसंघातील बऱ्यापैकी विषय संपला असला तरी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उत्तर मतदारसंघामध्ये मात्र सहा, सात ठिकाणी पेच निर्माण झाल्याचे समजते.
दरम्यान, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, शारंगधर देशमुख, सत्यजित कदम, रत्नेश शिरोळकर यांची एक बैठक येथील एका हॉटेलवर गुरुवारी सकाळी घेण्यात आली. विशेष म्हणजे या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अमित हुक्केरीकर यांचीही उपस्थिती होती. यावेळी भाजपकडून आणखी चार, पाच जागा कशा पदरात पाडून घेता येतील यासाठी शिंदेसेना आग्रही असल्याचे पाहावयास मिळाले.
क्षीरसागर यांच्या ‘इनकमिंग’ मोहिमेमुळे अडचणी
आमदार राजेश क्षीरसागर यांनी गेल्या विधानसभेपासून शहरभरातील अनेक प्रमुख आणि ताकदवान नेते, कार्यकर्त्यांचे जोरदार इनकमिंग करून घेतले. अगदी कालपर्यंत हे इनकमिंग सुरू होते. त्यामुळे आता या सर्वांना उमेदवार निवडीत स्थान देताना अडचणी येत आहेत. दुसरीकडे शिंदेसेनेत घेतलेले सत्यजित कदम आणि शारंगधर देशमुख हे देखील आपल्या काही कार्यकर्त्यांसाठी आग्रही आहेत. त्यामुळेच भाजपच्या कोट्यातून जागा काढून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
पुण्यातील बैठकीला न बोलावल्याने मुश्रीफ यांची नाराजी
पुण्यात बुधवारी झालेल्या बैठकीला भाजप आणि शिंदेसेनेचे प्रमुख नेते हजर होते; परंतु या बैठकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार)चे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. कोल्हापूर महापालिकेला राष्ट्रवादीचे १४ नगरसेवक होते. त्यामुळे त्यापेक्षा कमी जागा आम्ही घेऊ, अशी अपेक्षा कोणी ठेवू नये अशीही भूमिका मुश्रीफ यांनी घेतली आहे.