Kolhapur Municipal Election 2026: पाच वर्षे सत्तेत एकमत; आता काँग्रेस-राष्ट्रवादीची १२ जागांवर थेट लढत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:03 IST2026-01-02T12:59:23+5:302026-01-02T13:03:20+5:30
काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिष्ठा या जागांसाठी पणाला लागली

Kolhapur Municipal Election 2026: पाच वर्षे सत्तेत एकमत; आता काँग्रेस-राष्ट्रवादीची १२ जागांवर थेट लढत
पोपट पवार
कोल्हापूर : महापालिकेत २०१५ ते २०२० पर्यंत एकत्र येत सत्ता उपभोगणारी काँग्रेस-राष्ट्रवादी यंदाच्या महापालिकेत तब्बल १२ जागांवर आमने-सामने आली आहे. त्यामुळे काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिष्ठा या जागांसाठी पणाला लागली आहे. गत महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी स्वतंत्र लढली असली तरी निवडणुकीनंतर दोघांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. यात काँग्रेसने ३१ तर राष्ट्रवादीने १४ जागा जिंकल्या होत्या.
काँग्रेससोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीत दुफळी निर्माण झाल्याने राष्ट्रवादी (अजित पवार)ने थेट भाजपसोबत जाणे पसंत केले. कोल्हापुरातही त्याचे पडसाद उमटत मंत्री मुश्रीफ यांनी अजित पवार यांची संगत केली. परिणामी, महापालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादीचा दोस्ताना दुरावला. यंदाच्या महापालिका निवडणुकीत हाच दोस्ताना थेट आमने-सामने येईपर्यंत परावर्तित झाला आहे. त्यामुळे पाच वर्षे हातात हात घालून कारभार केलेली मंडळीच आता एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरली आहेत.
वाचा : महायुती उद्या प्रचाराचा नारळ फोडणार, मुख्यमंत्री फडणवीस यांचा १२ जानेवारीला प्रचार दौरा
प्रभाग क्रमांक ८ मध्ये काँग्रेसने प्रशांत खेडकर यांना उमेदवारी दिली असून, येथे त्यांचा सामना राष्ट्रवादी (अजित पवार)च्या अमिता कांदेकर यांच्यासोबत आहे. प्रभाग क्रमांक ११ मध्ये काँग्रेसच्या जयश्री चव्हाण यांच्याविरोधात राष्ट्रवादी (अजित पवार)ने यशोदा मोहिते यांना रिंगणात उतरवले आहे. तर प्रभाग क्रमांक १२ मध्ये काँग्रेसचे इश्वर परमार विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार)चे आदिल फरास अशी थेट लढत होत आहे. याच प्रभागात राष्ट्रवादी (अजित पवार)च्या माजी महापौर हसीना फरास यांच्याविरोधात काँग्रेसने स्वालिया बागवान यांच्या रूपाने आव्हान उभे केले आहे.
१३, १४ व १९ मध्ये रंगतदार लढती
प्रभाग क्रमांक १३ मध्ये काँग्रेसच्या प्रवीण सोनवणेंविरोधात राष्ट्रवादी (अजित पवार)ने उद्धवसेनेचे माजी नगरसेवक नियाज खान यांच्या हाती घड्याळ बांधत उमेदवारी दिली आहे. प्रभाग १४ मध्ये काँग्रेसच्या दिलशाद मुल्ला विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार)च्या प्रेमा डवरी असा सामना रंगणार आहे. प्रभाग १९ मध्ये काँग्रेसच्या शुभांगी प्रमोद पोवार यांच्याविरोधात राष्ट्रवादी (अजित पवार)ने मानसी सतीश लोळगे यांना मैदानात उतरवले आहे. प्रभाग १८ मध्ये राष्ट्रवादी (अजित पवार)च्या शिवानी स्वप्नील गुर्जर विरुद्ध काँग्रेसच्या अरुणा गवळी हा सामनाही रंगतदार हाेणार आहे.
प्रभाग १७ मध्ये चारही जागांवर थेट सामना
प्रभाग क्रमांक १७ मध्ये काँग्रेसच्या अर्चना संदीप बिरांजे विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार)च्या प्रियांका विश्वविक्रम कांबळे, काँग्रेसचे सचिन शेंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादी (अजित पवार)चे रवींद्र मुतगी, काँग्रेसच्या शुभांगी शशिकांत पाटील विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार)च्या जहिदा राजू मुजावर तर काँग्रेसचे प्रवीण केसरकर यांच्याविरोधात राष्ट्रवादी (अजित पवार)चे राजेंद्र पाटील यांच्यात थेट लढत होत आहे.