Kolhapur Politics: इचलकरंजी महापालिकेत महायुतीत बेकी.. सेना-राष्ट्रवादीत एकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 18:44 IST2025-09-13T18:44:03+5:302025-09-13T18:44:42+5:30
भाजपने स्वबळाचा निर्णय घेतल्यास तिरंगी लढत शक्य

Kolhapur Politics: इचलकरंजी महापालिकेत महायुतीत बेकी.. सेना-राष्ट्रवादीत एकी
अतुल आंबी
इचलकरंजी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील दोन घटक पक्षांनी एकत्र राहण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्र राहणार असून, महायुतीतील वरिष्ठ पातळीवरील निर्णयाप्रमाणे पुढील वाटचाल राहणार आहे. त्यामुळे आता भाजपने स्वबळाचा निर्णय घेतल्यास तिरंगी लढतीची चिन्हे निर्माण झाली आहेत.
गणेशोत्सवानंतर राजकीय घडामोडी गतिमान झाल्या आहेत. गणेशोत्सवाच्या कालावधीत महापालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली. त्यानंतर महाविकास आघाडीने बैठक घेऊन एकसंध राहण्याचा निर्णय कायम ठेवला. त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. कोणत्या मतदारसंघात कोणाचे प्राबल्य आहे, त्यानुसार जागावाटपाचा फॉर्म्युला तयार केला जाणार आहे. प्राथमिक चर्चेनंतर मदन कारंडे, शशांक बावचकर, राहुल खंजिरे, संजय कांबळे, सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, सयाजी चव्हाण, सदा मलाबादे यांच्या बैठका होऊन अंतिम यादी तयार होईल. त्यामध्ये महायुतीचा कोणता निर्णय होतो, याकडेही लक्ष लागले होते.
दरम्यान, शुक्रवारी माजी आमदार अशोक जांभळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष सुहास जांभळे, कार्याध्यक्ष अमित गाताडे यांची शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांची बैठक झाली. बैठकीत महायुतीमधील घटक पक्ष असलेले शिंदेसेना आणि राष्ट्रवादीचा गट एकत्रित राहून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर भाजप हा मोठा भाऊ असून, त्यांच्याकडून जो निर्णय येईल, त्या निर्णयासोबतही राहण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. तसेच पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून येणऱ्या सूचनेप्रमाणे पुढील दिशा ठरवली जाणार आहे.
या बैठकीतील निर्णयामुळे शहरातील निवडणूक तिरंगी होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कारण भाजपचे आमदार राहुल आवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेतच स्वबळाचा नारा दिला आहे. त्यानंतर शिंदेसेनेचे माने यांनी त्यादृष्टीने मतदारसंघातील चाचपणी सुरू केली होती. त्याप्रमाणे उमेदवार ठरविण्याचे कामही सुरू आहे. त्यात राष्ट्रवादीची भर पडल्याने बळ आले आहे.
जुना माने गट जुळविण्याचा प्रयत्न
शहरात सुरुवातीपासून खासदार माने गट कार्यरत होता. शहरातील सर्व राजकीय घडामोडींमध्ये हा गट अग्रेसर होता. कालांतराने त्यामध्ये फूट पडत सर्व नेते वेगवेगळ्या पक्षांत गेले. बऱ्याच वेळा लोकसभा निवडणुकीत हा गट अंडर करंट एकत्रित कार्यरत होतो, तसाच प्रकार महापालिका निवडणुकीतही करण्यासाठी हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.
भाजपच्या निर्णयाकडे लक्ष
माजी आमदार सुरेश हाळवणकर व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे गट सध्या भाजपमध्ये एकत्र कार्यरत आहेत. दोघांकडेही अनेक प्रभागांत मातब्बर उमेदवार आहेत. त्यामुळे त्यातील कोणाला उमेदवारी मिळणार, यावर अन्य कार्यकर्त्यांची दिलजमाई ठरणार आहे. त्यानंतर महायुतीचा निर्णय होईल. त्यामुळे या दोघांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
चोपडे बाजूलाच
जुन्या मूळ राष्ट्रवादीत सुरुवातीपासूनच गटबाजी आहे. त्यामध्ये जांभळे-कारंडे गट होते. त्यानंतर वरिष्ठ पातळीवरून काका-पुतण्याचा गट विभागल्यानंतर शहरातील राष्ट्रवादीत विभाजन झाले. त्यामध्ये पुन्हा अजित पवार गटात गटबाजी होऊन माजी सभापती विठ्ठल चोपडे हे बाजूला आहेत. त्यांचा गट कोणता निर्णय घेतो, याकडेही लक्ष आहे.