Kolhapur: सतेज पाटील भाजप, राजेश क्षीरसागरांच्या बुथवर गेले, नाचणारे कार्यकर्तेही थबकले-video
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 19:19 IST2025-09-08T19:18:33+5:302025-09-08T19:19:24+5:30
क्षीरसागर दवाखान्यातून मिरवणुकीत

Kolhapur: सतेज पाटील भाजप, राजेश क्षीरसागरांच्या बुथवर गेले, नाचणारे कार्यकर्तेही थबकले-video
कोल्हापूर : विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने राजकीय नेत्यांमधील खिलाडूपणा शनिवारी रात्री पापाची तिकटी परिसराने अनुभवला. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार मालोजीराजे हे भाजपसह राजेश क्षीरसागर यांच्या स्वागत कक्षात गेल्याने मिरवणुकीत नाचणारे कार्यकर्तेही काही मिनिटे थबकले. या दोघांनीही सर्वपक्षीय स्वागत कक्षात हजेरी लावली. मात्र, सत्यजीत कदम यांच्या कक्षात जाणे टाळले.
महाद्वार रोड, पापाची तिकटी ते गंगावेश मार्गावर महापालिका, पोलिस दल, शरदचंद्र पवार पक्ष, उद्धवसेना, मनसे, भाजप, आप, वाहतूक सेना, सत्यजीत कदम, छत्रपती परिवार, शिंदेसेना, रामभाऊ चव्हाण फाउंडेशन, सकल हिंदू समाज, कोल्हापूर सराफ संघ, बंगाली कारागीर असोसिएशन, नवशक्ती यांनी स्वागत कक्ष उभारले होते.
महापालिका कक्षात सतेज पाटील आल्यानंतर त्यांनी काही काळ मंडळांना मानाचे नारळ दिले. त्यानंतर, मालोजीराजे यांच्यासह ते सर्वच स्वागत कक्षात गेले. राजेश क्षीरसागर यांच्या कक्षात गेल्यानंतर क्षीरसागर यांनी हात पुढे केला. तेव्हा हातात हात घेतल्यानंतर तब्येतीची काळजी घ्या, असा सल्ला सतेज यांनी राजेश यांना दिला. कारण क्षीरसागर हे दोन दिवस दवाखान्यात होते. तेथूनच ते थेट मिरवणुकीत आले होते.
यानंतर, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हाक मारल्यानंतर ‘तुम्ही मूळ भाजपचे आहात, मी येतो,’ असे म्हणत सतेज पाटील वर चढले. पाठोपाठ मालोजीराजेही गेले. जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी या दोघांचे स्वागत केले. शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी स्वागत केले.
नेते मंडळीचे नृत्य आणि सारथ्य
मालाेजीराजे यांनी पीटीएमच्या मिरवणुकीचे उद्घाटन केल्यानंतर डीजेच्या तालावर नृत्य केले आणि पिवळा निळा झेंडाही फिरवला. सतेज पाटील यांनीही नृत्याचा आनंद घेतला, तर राजेश क्षीरसागर मिरवणुकीत आल्यानंतर मित्रप्रेम मंडळाच्या ट्रॅक्टरचे सारथ्यही केले.
काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी साउंड सिस्टमच्या तालावर ठेका धरला
आमदार राजेश क्षीरसागर यांनी गणेशमूर्ती नेणाऱ्या ट्रॅक्टरचे सारथ्य केले