Kolhapur Municipal Election Voting 2026: महापालिकेवर झेंडा आमचाच; महायुती-महाविकास आघाडीच्या नेत्यांचा दावा, पाटील-क्षीरसागर-महाडिक काय म्हणाले.. वाचा
By संदीप आडनाईक | Updated: January 15, 2026 19:06 IST2026-01-15T19:05:47+5:302026-01-15T19:06:59+5:30
'ते निगेटिव्ह सेटर आहेत, त्यांचे काय ऐकायचे'

Kolhapur Municipal Election Voting 2026: महापालिकेवर झेंडा आमचाच; महायुती-महाविकास आघाडीच्या नेत्यांचा दावा, पाटील-क्षीरसागर-महाडिक काय म्हणाले.. वाचा
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आज, गुरुवारी सकाळपासून सुरु झालेल्या मतदानासाठी वेळ संपत आली तरी अनेक मतदान केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत. दुपारी साडेचार वाजेपर्यंत ५०.८५ टक्के मतदान झाले असले तरी मोठ्या चुरशीने अनेक केंद्रावर मतदान सुरु असल्याने मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ होणार आहे. दरम्यानच, मतदानाचा हक्क बजावल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींनी आपल्यालाच यश मिळेल असा दावा केला आहे. मतदान केल्यानंतर या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या ते वाचा.
आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेना नेते : देशात नरेंद्र मोदी आणि राज्यातील महायुतीचे सरकार, लाडक्या बहिणींचा आशीर्वाद यांच्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेत सत्तांतर होवून ६५ च्या वर जागा महायुतीला मिळतील आणि मतदार विकासाच्या बाजूने मतदान करतील असे मला वाटते. गेल्या पाच वर्षात कोल्हापूर शहरात विकासाचे वारे वाहते आहेत. कोल्हापूरचा महापौर हा महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील. महायुतीचे सर्व निर्णय हे एकमताने होतील. शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिल, शिवसेना २२ जागा घेतील. आमदार सतेज पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना ते निगेटिव्ह सेटर आहेत, त्यांचे काय ऐकायचे. त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे.
आमदार सतेज पाटील, काँग्रेस नेते: राज्यात काँग्रेसच्या बाजूने आणि महायुतीच्या विरोधात चांगले मतदान झाले आहे. महाराष्ट्रात महायुती स्वतंत्रपणे लढत आहे, मात्र कोल्हापुरकरांच्या भीतीमुळे इथे मात्र एकत्र आले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना इथल्या त्यांच्या नेतृत्वावर विश्वास नसल्यामुळेच त्यांच्या सभा कोल्हापुरात झाल्या. पण या एकट्या लढाईला कोल्हापूरकर तोंड देत आहेत.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची रात्रीतून धरपकड करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. ही दडपशाही कोल्हापूरकर चालू देणार नाहीत आणि माझ्या बाजूने राहतील याचा मला विश्वास आहे. मुख्यमंत्र्यांच्या राज्यभर स्क्रीप्टेड मुलाखती सुरु आहेत. राज्यात महायुतीविरोधात काँग्रेस सक्षमपणे उभी आहे, त्यामुळे २२ टक्के मते पक्ष घेईल आणि नगरसेवकांचा टक्काही वाढेल. स्पष्ट बहुमत काँग्रेस घेईल. इचलकरंजीतही शाहू आघाडीच्या माध्यमातून चांगले यश मिळेल आणि मूळ भाजप आणि नव्या भाजपचा उद्रेक पथ्यावर पडेल.
खासदार शाहू महाराज छत्रपती (काँग्रेस): मतदानाचा हक्क मतदार बजावतील. त्यांच्या तो हक्कच आहे. परंतु योग्य उमेदवारांना निवडून ते आणतील अशी खात्री आहे. असे झाले तरच शहराचा विकास होत राहील. एका बाजूला काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूला इतर पक्षांची एकजूट असे चित्र कोल्हापुरात दिसत असले तरी काँग्रेसचा आणि घटक पक्षांचाच झेंडा कोल्हापूर महानगरपालिकेव फडकेल हे निश्चितच.
खासदार धनंजय महाडिक (भाजप): लोकशाहीचा लोकोत्सव दहा वर्षांनंतर महापालिकेत होतो आहे. महायुतीला कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड समर्थन मिळत आहे. विकासावर लोकांचा विश्वास वाढत आहे. एकावेळी चार मते टाकण्याचा पहिल्या अनुभव मतदार अनुभवत आहेत. राज्यातील २९ महापालिकेत महायुतीचे सरकार येईल. माझा वाढदिवस आज असला तरी उद्या महायुतीच्या विजयी उमेदवारांसोबत साजरा करणार आहे. इचलकरंजीतही चांगले यश मिळणार आहे.
काँग्रेसकडे राज्यातील नेतेच उरलेले नाहीत, आणि जे कोल्हापुरात आले त्यांना काेणीच ओळखत नाही ही स्थिती आहे. कार्यकर्तेही उमेदवार म्हणून मिळालेले नाहीत, म्हणून कुठे नवराबायकोला तर कुठे वडील मुलगीला उभे केले आहे. धनदांडग्यांना उमेदवारी दिली असली तरी जनशक्ती महायुतीलाच साथ देतील. पराभव दिसत असल्यामुळे काँग्रेस नेते सैरभैर झालेले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळे ते वाट्टेल तसे आरोप करत आहेत. त्यांचा मानसिक तोल ढळलेला आहे. केएमटी तोट्यात असताना ती मोफत देउ असे आमीष दाखवत आहेत. परंतु महिला त्यांच्या आश्वासनाला भुलणार नाहीत.