Kolhapur Municipal Election: आरक्षण पडले; राजकारण तापले, महाविकास आघाडीत अद्याप 'वेट अँड वॉच'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 18:11 IST2025-11-14T18:10:33+5:302025-11-14T18:11:34+5:30
काँग्रेस पक्षावरच ‘मविआ’ची भिस्त

Kolhapur Municipal Election: आरक्षण पडले; राजकारण तापले, महाविकास आघाडीत अद्याप 'वेट अँड वॉच'
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीतील घटक पक्षांत राजकीय हालचाली गतिमान झाल्या असल्या तरी महाविकास आघाडीत मात्र अद्याप शांतता आहे. आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांचीही चर्चा अद्याप झालेली नाही. नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका झाल्यानंतरच नेते महापालिका निवडणूक अजेंड्यावर घेतील. मात्र तरीही काँग्रेस पक्षातील दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षातील अनेक माजी नगरसेवक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले. काँग्रेसला अगदी सुरुवातीलाच जोरदार झटका बसला. त्यामुळे काँग्रेसला आपल्या पक्षातील पडझड सावरूनच पुन्हा ताकदीने निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. सध्या काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील नगरपालिका, पंचायत समिती निवडणुकीत व्यस्त आहेत. शिवाय पक्षाच्या मुंबईत होत असलेल्या बैठकीतही सहभागी होत असल्याने त्यांना महापालिकेच्या घडामोडींकडे लक्ष देता आले नसल्याचे काँग्रेस पक्षातून सांगण्यात येते.
जेव्हा काँग्रेसमधून काही माजी नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला, तेव्हा आमदार सतेज पाटील यांनी एक बैठक घेतली होती. लढायचे असेल तर ठामपणे पाठीशी राहा, ज्यांना कोणाला जायचे असेल तर त्यांनी आधीच सांगावे, असेही त्यांनी बैठकीत सांगून टाकले होते. त्यामुळे उपस्थित जवळपास ४० ते ४५ माजी नगरसेवकांनी आम्ही काँग्रेससोबत आहोत, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार सर्वच माजी नगरसेवक तसेच शहर काँग्रेस समितीचे काही पदाधिकारी निवडणुकीची प्राथमिक तयारी करताना पाहायला मिळत आहेत. उमेदवारी मागणीचे अर्ज वाटप येत्या एक-दोन दिवसात होणार आहे. ज्यांना उमेदवारी पाहिजे, त्यांनी छापील अर्ज भरुन द्यावे लागणार आहे.
राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची जयंत पाटील यांच्याशी चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची इस्लामपूर येथे भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीत चर्चा केली. जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, शहराध्यक्ष आर.के. पोवार, माजी आमदार राजीव आवळे, अनिल घाडगे, बाजीराव खाडे यांच्यासह अन्य प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार पाटील यांनी जिल्ह्यातील पक्षाची ताकद, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांबाबत माहिती घेतली. सर्वच निवडणुकांसाठी मतदारसंघनिहाय उमेदवारांच्या याद्या तयार करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
उद्धेव सेनेचे नेते माजी खासदार विनायक राऊत, अरुण दुधवडकर यांनीही कोल्हापुरात येऊन पक्षाचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी निवडणुकीबाबत चर्चा केली आहे. त्यांच्याकडून प्रभागनिहाय उमेदवारांची यादी तयार केली जात आहे.
सतेज पाटील यांच्यावरच भिस्त
महाविकास आघाडीची सगळी भिस्त आमदार सतेज पाटील यांच्यावरच असेल. राष्ट्रवादी, उद्धव सेना यांच्याशी चर्चा करुन आमदार पाटील यांना उमेदवाराची कदाचित अदलाबदलही करावी लागण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांना पुरेसे उमेदवार न मिळाल्यास काँग्रेसलाच त्यात पुढाकार घ्यावा लागण्याची शक्यता आहे.
डाव्या पक्षांची पाच जागांची मागणी
काँग्रेस पक्षाला डाव्या पक्षांनाही सोबत घ्यावे लागणार आहे. त्यामुळे या पक्षांकडूनही उमेदवारी मागितली जाणार आहे. भाकप तर्फे पाच कार्यकर्ते निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. या पाच जागांची मागणी आघाडीकडे करण्यात येणार आहे.