काँग्रेससह शिंदेसेना, भाजपमध्येही बंडाळी सुरु; अक्षय जरग, राहुल चव्हाण, रामुगडे अपक्ष; संदीप नेजदार नॉटरिचेबल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:08 IST2025-12-30T13:05:24+5:302025-12-30T13:08:39+5:30
माजी नगरसेवक अशोक जाधव यांनी काँग्रेसमार्गे भाजप करत सोमवारी शिंदेसेनेत प्रवेश केला

काँग्रेससह शिंदेसेना, भाजपमध्येही बंडाळी सुरु; अक्षय जरग, राहुल चव्हाण, रामुगडे अपक्ष; संदीप नेजदार नॉटरिचेबल
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारीचा पत्ता कट झाल्याने आता अनेकांनी बंडखोरी करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेससह शिंदेसेना आणि भाजपमध्येही बंडाळी सुरु झाल्याने ती शमविण्यासाठी नेत्यांच्या नाकीनव आले आहे.
प्रभाग क्रमांक १० मधून काँग्रेसकडून इच्छुक असलेले अक्षय विक्रम जरग यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी सोमवारी अपक्ष अर्ज दाखल करत बंडखोरीचे निशाण फडकविले. दुसरीकडे प्रभाग क्रमांक १ मधून काँग्रेसने उमेदवारी नाकारलेले माजी नगरसेवक डॉ. संदीप नेजदार सोमवारी नॉटरिचेबल राहिल्याने शंका-कुशंकाने चांगलेच पेव फुटले.
महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० मधील सर्वसाधारण जागेवर उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले व काँग्रेसचे कार्यकर्ते अक्षय जरग या दोघांनीही दावा सांगितला होता. अखेर ही जागा महाविकास आघाडीत उद्धवसेनेला गेल्याने जरग यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. जरग यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीत पहिली बंडखोरी झाल्याचे मानले जाते.
दरम्यान, प्रभाग क्रमांक १ मध्ये माजी नगरसेवक संदीप नेजदार यांच्यासह सचिन चौगले यांचे नाव चर्चेत होते. काँग्रेसने सचिन चौगले यांच्या पारड्यात आपले वजन टाकल्याने नेजदार यांना यंदा थांबावे लागणार आहे. डॉ. नेजदार यांना उमेदवारी नाकारल्यानंतर डॉ. नेजदार व पूर्वाश्रमीचे त्यांचे सहकारी शिंदेसेनेचे शारंगधर देशमुख यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, हे फोटो फेक असल्याचा दावा नेजदार सर्मथकांकडून करण्यात आला. दरम्यान, शिंदेसेनेचे एकमेव माजी नगरसेवक राहुल चव्हाण यांचा पत्ता कापल्याने त्यांनी अपक्ष मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे.
अशोक जाधव शिंदेसेनेत
माजी नगरसेवक अशोक जाधव यांनी काँग्रेसमार्गे भाजप करत सोमवारी शिंदेसेनेत प्रवेश केला. जाधव यांचे पुत्र अजिंक्य जाधव प्रभाग पाचमधून उमेदवारीसाठी इच्छुक होते. प्रभाग १ मधून त्यांच्या पत्नीचेही नाव चर्चेत होते.
रामुगडेंची बंडखोरी
भाजपचे माजी नगरसेवक सुभाष रामुगडे हे प्रभाग क्रमांक १९ मधून भाजपकडून इच्छुक होते. मात्र, त्यांना पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी अपक्ष मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे.
बीडकर राष्ट्रवादीत
उद्धवसेनेचे उपशहर प्रमुख शशिकांत बीडकर यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला असून, तेथून ते उमेदवारी घेण्याच्या तयारीत आहेत.
प्रभाग क्रमांक १० मध्ये सर्वसाधारण जागेवर उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली होती. मात्र, महाविकास आघाडीत ही जागा उद्धवसेनेला गेल्याने मी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. - अक्षय जरग, उमेदवार, प्रभाग क्रमांक १० कोल्हापूर