Kolhapur Municipal Election 2026: महायुती उद्या प्रचाराचा नारळ फोडणार, मुख्यमंत्री फडणवीस यांचा १२ जानेवारीला प्रचार दौरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:17 IST2026-01-02T12:14:21+5:302026-01-02T12:17:10+5:30
इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांचा उद्या 'रोड शो'

Kolhapur Municipal Election 2026: महायुती उद्या प्रचाराचा नारळ फोडणार, मुख्यमंत्री फडणवीस यांचा १२ जानेवारीला प्रचार दौरा
कोल्हापूर : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. तर, उद्या शनिवारी ‘भाजप’चे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ होणार आहे. १२ जानेवारीला दुपारी मुख्यमंत्री फडणवीस ‘मिसळ कट्टा’ कार्यक्रमात सहभागी होणार असून, यावेळी विविध क्षेत्रांतील एक हजार मान्यवर उपस्थित असतील. फडणवीस यांची यावेळी मुलाखत घेण्यात येणार असून, ती शहरातील ८० ठिकाणी लाईव्ह दाखवण्यात येणार आहे.
एकाच ठिकाणी सभा घेऊन भाषणे देण्यापेक्षा मुलाखतीच्या माध्यमातून कोल्हापूरच्या विकासाबाबत थेट मुख्यमंत्री फडणवीसच आपली मते मांडणार आहेत. प्रचाराच्या यंत्रणेचा भाग म्हणून भाजपने माजी स्थायी सभापती विजय सूर्यवंशी यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली असून, शिंदेसेनेने रत्नेश शिरोळकर यांची नियुक्ती केली आहे. या दोघांवर राष्ट्रवादीच्या समन्वयकासह संपर्कात राहून महायुतीमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.
वाचा : शोभा बोंद्रे, आनंद माने यांच्यासह ४८ उमेदवारांनी घेतली माघार, आज होणार चित्र स्पष्ट
उद्या शनिवारी महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ होणार आहे. प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर चव्हाण यांचा हा पहिलाच कोल्हापूर दौरा असल्यामुळे त्यांच्या स्वागताची आणि महायुतीच्या प्रचार प्रारंभाची जय्यत तयारी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून सुरू आहे.
इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांचा उद्या 'रोड शो'
इचलकरंजी : महापालिकेच्या निवडणुकीतील महायुती उमेदवारांच्या प्रचार प्रारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वस्त्रनगरीत येत आहेत. शनिवारी (दि.३) दुपारी मुख्य मार्गावर रोड शो होणार आहे, अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी दिली.
वाचा : पाच वर्षे सत्तेत एकमत; आता काँग्रेस-राष्ट्रवादीची १२ जागांवर थेट लढत
राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा येथून या रोड शोचा प्रारंभ होईल. तेथून श्री शिवतीर्थ, श्री शंभूतीर्थ, महात्मा गांधी पुतळा, राजवाडा चौक असा रोड शो होईल. याचठिकाणी सांगता होणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन त्याचबरोबर आदर्श आचारसंहिता आणि नियमांचे काटेकोर पालन करण्यासंदर्भात शहर भाजपा कार्यालयात बैठक झाली.
उपमुख्यमंत्री शिंदे बुधवारी येणार
उपमुख्यमंत्री शिंदे हे ७ जानेवारीला आणि अजित पवार हे ९ जानेवारीला प्रचारासाठी कोल्हापुरात येणार आहेत.
प्रचाराला वेग, महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडणूकविषयक मार्गदर्शन
महायुतीच्या जागावाटपानंतर आता खऱ्या अर्थाने प्रचाराला वेग आला आहे. याचाच एक भाग म्हणून गुरुवारी संध्याकाळी येथील एका हॉटेलवर महायुतीच्या सर्व उमेदवारांना एकत्र करून त्यांना निवडणूकविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
दरम्यान, चव्हाण हे कोल्हापुरात आल्यानंतर अंबाबाईचे दर्शन घेणार असून, त्यानंतर शहरातून भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे. पदयात्रा समारोपावेळी आमदार रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन होणार आहे. ‘भाजप’ने महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, सर्व पातळ्यांवर कार्यकर्त्यांना सूक्ष्म नियोजनाच्या माध्यमातून सक्रिय राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.