Kolhapur Politics: श्रीकृष्णाची भूमिका घेऊ पण सुदर्शन चक्र कोठून आणू, हसन मुश्रीफांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 03:38 PM2024-03-30T15:38:08+5:302024-03-30T15:38:33+5:30

'संजय मंडलिक यांना विजयी करण्याची शपथ घेऊन कामाला लागा'

Let us take the role of Krishna but from where will we bring Sudarshan Chakra, Hasan Mushrif's suggestive statement | Kolhapur Politics: श्रीकृष्णाची भूमिका घेऊ पण सुदर्शन चक्र कोठून आणू, हसन मुश्रीफांचे सूचक विधान

Kolhapur Politics: श्रीकृष्णाची भूमिका घेऊ पण सुदर्शन चक्र कोठून आणू, हसन मुश्रीफांचे सूचक विधान

कोल्हापूर : शाहू छत्रपती यांचे सगळ्यांशी जवळचे संबंध आहेत, पण हे महाभारत आहे. सगेसोयरे विरोधात असले तरी सत्याच्या बाजूने उभे राहून निवडणूक जिंकायची आहे. काहींनी श्रीकृष्णाची भूमिका घेण्यास सांगितले पण, सुदर्शन चक्र कोठून आणू. हे जरी खरे असले तरी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून संजय मंडलिक यांना विजयी करण्याची शपथ घेऊन कामाला लागा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर होते. पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात देशात रस्त्याचे जाळे विणले असून सामान्य माणसाला सन्मान देण्याची भूमिका घेतली. त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिक यांना खासदार करण्याची गरज आहे.

खासदार संजय मंडलिक म्हणाले, शाहू छत्रपती हे आमच्यासाठी आदरणीय आहेत. त्यांच्याविरोधात आम्हाला लढाई करायची नाही. माझे व्यक्तिगत चांगले संबंध आहेत. कोणाचा तरी बळी द्यायचा म्हणून काही मंडळींनी त्यांना भरीस घातले. राजकीय संधीसाधू करणाऱ्यांनी शाहू छत्रपतींचा अपमान केला असून आम्ही गादीचा निश्चितच सन्मान करू, कोणावर टीका करणार नाही, पण ही आत्मसन्मानाची निवडणूक आहे. हसन मुश्रीफ यांना दहा लोकसभा निवडणुकांचा अनुभव असल्याने त्यांना वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यांच्या नेतृत्वाखालीच ही निवडणूक लढविणार असून ते सरसेनापती आहेतच, त्यांच्या श्रीकृष्णाच्या भूमिकेमुळे विजय निश्चित आहे.

बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, रामेश्वर पत्की, आदील फरास यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, रेखा आवळे, परीक्षित पन्हाळकर, महेंद्र चव्हाण, महेश सावंत, रमेश पोवार, राजेश लाटकर, प्रकाश गवंडी, संदीप कवाळे, प्रकाश पाटील, प्रकाश कुंभार, सतीश लोळगे, संभाजी देवणे, शारदा देवणे आदी उपस्थित होते. महेश सावंत यांनी आभार मानले.

पांग फेडण्यात पाच वर्षे गेली

मागील निवडणुकीत आमचं ठरलंय म्हणून मदत करणाऱ्यांचा पांग फेडण्यात पाच वर्षे गेली. त्यांच्यात नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांना निधी देत गेल्याने आपल्याकडे दुर्लक्ष झाले असेल पण आगामी काळात महायुती सोडून कोणाला मदत करणार नसल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले.

संचालक परदेश दौऱ्यावर; पदाधिकारी आयोध्याला

जिल्हा बँकेचे संचालक ११ मे पासून परदेश दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगत, याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना अयोध्येच्या दर्शनासाठी पाठवले जाणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

आप्पांचा कानमंत्र आणि मुश्रीफांची साथ

सकाळीच माजी आमदार महादेवराव महाडीक यांची भेट घेतली. त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर ‘हसन मुश्रीफ तुमच्यासोबत आहेत ना? त्यांना धरलंय की सगळे व्यवस्थित होते’ असा कानमंत्र त्यांनी दिल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले.

कोल्हापूर शहरात आपणच पुढे

उमेदवारी उशिरा जाहीर झाल्याने प्रचारात विरोधक पुढे असल्याचे सांगितले जाते. पण, हसन मुश्रीफ व धनंजय महाडीक यांच्यामुळे दोन दिवसातच आपण त्यांच्या बरोबरीने गेलो आहे. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सगळे एक असताना जयश्री जाधव यांना ९७ हजार आणि सत्यजीत कदम यांना ७६ हजार मते मिळाली. आता राष्ट्रवादीसह शिवसेना भाजपसोबत असल्याने कोल्हापूर शहरात आपणच पुढे असल्याचे मंडलिक यांनी सांगितले.

Web Title: Let us take the role of Krishna but from where will we bring Sudarshan Chakra, Hasan Mushrif's suggestive statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.